Ashok Gehlot On Jodhpur Violence: राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदनिमित्त मोठा गोंधळ झाला. झेंडे लावण्यावरून दोन समुदायांमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेक आणि तोडफोडीत झाले. यानंतर संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करावी लागली. या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एबीपी न्यूजशी खास संवाद साधला आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून निवडणुकीपूर्वी एका अजेंड्याखाली हे राबवण्यात येत आहे.


''भाजप नेत्यांना सूचना दिल्या आहेत''


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, ''जोधपूरमध्ये दंगल झाली असती. हे सर्व करौलीतही भाजपच्या इशाऱ्यावर घडले असून आरोप काँग्रेसवर लावण्यात आले. हे सर्व एका अजेंड्याअंतर्गत केले जात आहे. लोकांना कसे भडकावायचे याची माहिती हायकमांडने भाजप नेत्यांना दिली आहे. हे सर्व त्यांच्याकडून होत आहे. मात्र कोणत्याही धर्माच्या, जातीच्या नावावर होणारी हिंसा इथे खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना मी सर्वांना दिल्या आहेत. आमच्या सतर्कतेमुळे कोणीही जखमी झाले नाही आणि दंगलही झाली नाही.''


भाजप-आरएसएसचा अजेंडा देशासाठी धोकादायकः गेहलोत


अशोक गेहलोत म्हणाले की, या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यामध्ये फरार असलेल्या भाजप नेत्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी कारवाई पूर्ण होत असून, आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याचे काम केले जाणार आहे. गेहलोत म्हणाले की, भाजप आणि आरएसएसचा अजेंडा देशासाठी अत्यंत घातक आहे. आज लोकशाही धोक्यात आली असून राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राजस्थान लक्ष्य आहे. दिल्लीत फोन करून सर्व नेत्यांना राजस्थानमध्ये काय करायचे, याच्या सूचना दिल्या जात आहेत.


उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर आणि एन्काउंटर राज: गेहलोत


अशोक गेहलोत म्हणाले की, सध्या उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझर आणि बनावट चकमकीचे राज सुरू आहे. यूपीमध्ये लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली केली जात आहे. बुलडोझर कारवाईवर देशभरातील लोकांचा आक्षेप आहे. ज्यांचा कायदा आणि संविधानावर विश्वास आहे, त्यांचा बुलडोझर राजवर विश्वास नाही. राजस्थानमध्ये रमजान पूर्णपणे शांततेत आहे. राजस्थानमध्ये अनेक शतकांपासून बंधुभावाची परंपरा आहे.