मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे. काल गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला होता. आज विधानभवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. विधिमंडळाच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेतल्यानं वाद वेळीच थांबला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला. हल्ला कोणी केला हे जोरात बोला, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
विधानसभेत जर तुम्ही गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे जीव सुरक्षित नाहीत. मला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर अजून काय काय लिहिलं आहे. भाषण करुन बाहेर आलो होतो, मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर गेलो होतो.हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते. विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार, काय गुन्हा आहे आमचा, कुणीतरी मवाल्या सारखा येतो, आई बहिणींवरुन शिव्या देतो, त्याला पार्लमेंटरी शब्द करुन टाका, अनपार्लमेंटरी शब्द वापरतात, ते पार्लमेंटरी करुन टाका, सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज, असा तीव्र संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की त्याला जाऊन भेटाना तो तिथं आहे, असं म्हटलं. मला काही माहिती नाही, तिथं जाऊन बघा, असं पडळकर यांनी म्हटलं. कोण आहे तो मला माहिती नाही, असंही पडळकर यांनी म्हटलं. मारामारीसंदर्भात विचारलं असता पडळकर यांनी माहिती नाही असं म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी ते समर्थक आहेत की गुंड आहेत, असा सवाल केला. ही परिस्थिती राज्याची आली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यानं पास दिले असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा अधिकार अध्यक्षांचा असतो, त्यांची दिशाभूल केली गेली का असा सवाल आहे. अशी गुंडगिरी विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर अवघड आहे. गृहमंत्र्यांनी या गुंडांवर आणि गुंडांच्या पोशिंद्यांवर कारवाई केली पाहिजे, तरच तुम्ही राज्याचे तरच पालक, मुख्यमंत्री असण्यास पात्र आहात असं म्हणावं लागेल.
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणाचा अहवाल मागवला असून कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं.