मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आपल्याला त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवले होते. हे प्रकरण 2019 साली निकालात निघाले होते. मात्र, आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी मुंबईत विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली.


माझ्यावर 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे हा खटला सुरु होता, 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे. मला या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यावेळी न्यायालयाने मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असते. तुम्हीही (पत्रकार) त्यापेक्षा मोठे नाही. हा निकाल येऊन सहा वर्षे झाली आहेत. किमान कुठल्यावेळी विषय समोर आणावा, याला राजकीय लोकांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असे मला वाटते. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांचं सात दिवसांपूर्वी निधन झालं. मला भावनिक विषय करायचा नाही. पण ज्या वडिलांना मला संघर्ष करुन मोठं केलं, वाढवलं त्यांच्या मृत्यूनंतर मला अस्थीविसर्जनही करुन देण्यात आले नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधक करतील, ही अपेक्षा मला नव्हती. पण शेवटी राजकारणात अशा गोष्टी होत असतात. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे माझी जबाबदारी आहे, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले. 


माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार, जयकुमार गोरेंचा इशारा


ज्यांना आज माझ्यावर आरोप केले त्या प्रत्येकावर मी आजच सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. तसेच ज्यांनी माझी बदनामी केली त्या संबधितांवर मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. मी अजूनही संबंधित महिलेला त्रास देतोय, असा आरोप केला जात आहे. मी या महिलेला त्रास दिला असेल तर पोलिसांनी त्याची चौकशी करावी. या तपासात मी किंवा संबंधित महिला जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करावी, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले.


2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. जे रेकॉर्ड होतं ते देखील हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र,जयकुमार गोरे यांना विवस्त्र फोटो पाठवल्याप्रकरणी त्यावेळी न्यायालयात महिलेची माफी लागली होती, असा आरोप आता केला जात आहे.



आणखी वाचा


मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया