जळगाव:  सत्य वेगळं असतं आणि बाहेर वेगळं दाखवलं जात असल्याचा अनुभव भाजपात आला. त्यामुळेच आपण भाजप (BJP)  सोडून ठाकरे गटात सहभागी झालो, असं जळगाव लोकसभा मतदारसंघाचे (Jalgaon Lok Sabha)  महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi)  उमेदवार करण पवार यांनी म्हटलं. काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उमेदवार करण पवार यांनी भाजपावर टीका केली.


करण पवार म्हणाले,  भाजपामध्ये असताना आत सत्य वेगळे असायचे आणि बाहेर सोई नुसार वेगळे दाखविले जायचे आणि म्हणूनच आपण भाजपा सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे आलो आहे. भाजपकडे  सत्ता, पैसा,यंत्रणा असल्याने ते काहीही बोलू शकतात  . कोणालाही काही म्हणत आहेत.  सत्ता असल्याने आव्हान मोठे आहे पण जनतेच्या दरबारात न्याय मिळेल अशी आशा आहे.सत्ता असल्याने पैसा ,दबाव तंत्र, यंत्रणा आहे.  ते मोठे लोक असल्याने ते कोणालाही काहीही म्हणू शकतात. मात्र विरोधात गेलो असल्याने विरोध होईल हे अपेक्षित असताना ही आपण विरोधकांच्या भूमिकेत उद्धव ठाकरे गटाकडे आलो आहोत आणि जनतेतून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव येत आहे. 


काठ्या खायच्या नसतील तर काठ्या हातात घेण्याची वेळ : संजय पवार


दुसरीकडे या बैठकीत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून आपल्यावर आणि जनतेवर कसा अन्याय होत आहे याची जाणीव करून दिली. हा अन्याय दूर करायचा असेल तर भाजपाला जिल्ह्याच्या बाहेर काढावे लागेल नाहीतर त्यांच्या काठ्या आपल्याला खाव्या लागतील. काठ्या खायच्या नसतील तर आपणही काठ्या हातात घेण्याची वेळ असल्याचं संजय पवार यांनी म्हटले आहे.


उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाची ताकद वाढणार


 महाविकास आघाडीकडून (MahaVikas Aghadi) जळगाव लोकसभेसाठी (Jalgaon Lok Sabha)  पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar)  यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. करण पवार यांना उमेदवारी देऊन शिवसेना उबाठा गटाने भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील विक्रमी मताधिक्याने जळगावातून निवडून आले होते. करण पवार हे उन्मेष पाटील यांचे जवळचे मित्र आहे. त्यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रात खिळखिळ्या झालेल्या ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. 


हे ही वाचा :


 मित्राचे तिकीट कापल्याने पक्ष सोडला, उन्मेष पाटलांसोबत ठाकरे गटात प्रवेश, कोण आहेत जळगावचे उमेदवार करण पवार?