Raj Thackeray & Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले होते. मात्र, मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर मनसे-शिवसेना युतीची शक्यता संपल्याचे अनेकांना वाटत होते. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शाळांमधील हिंदी सक्तीच्या विरोधात 6 जुलैला मुंबईतील गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. यासाठी आपण सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj Thackeray Morcha on Girgaon Chowpaty)

यावेळी राज ठाकरे यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बोलले की ते पण आलेच ना. आमची माणसं त्यांच्याशी बोलणार. तुमचं इतके दिवस जे सगळं चालू होतं (युतीबाबत) त्यामध्ये तुम्हाला माझं सगळ्यात पहिलं बोललेलं वाक्य आठवत असेल. 'कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे', असे मी म्हटले होते. या वाक्याची प्रचिती तुम्हाला 6 तारखेला येईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे आता 6 तारखेच्या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांना राज यांनी निमंत्रण दिल्यास, ते या मोर्चाला जाणार का, हे पाहावे लागेल. कारण उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र, ते राज ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गिरगावच्या मोर्चात सहभागी होणार का, हे बघावे लागेल.

Raj Thackeray: राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

शाळेत पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती मी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. या गोष्टींसाठी 6 जुलैला गिरगाव चौपाटीवर मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत.  विद्यार्थी आणि पालकांना यायला जमेल म्हणून मी रविवारी निवडला आहे. मी बाकीच्या राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहे. हा जो कट आहे, महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे, हा उद्ध्वस्त करण्यासाठी तमाम मराठी बंधू आणि भगिनींनी मोर्चात सहभागी व्हावं, अशी माझी विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल. त्या अजेंड्यासाठी तमाम मराठी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हेदेखील मला बघायचं आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठी बातमी : राज ठाकरेंची गर्जना, 6 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा, हिंदीविरोधात आर-पारची लढाई