मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अधुनमधून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या सातत्याने उठत आहेत. जयंत पाटील यांनी या वृत्ताचा इन्कार केला असला तरी ही कुजबूज काही थांबायला तयार नाही. अशातच आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या एका वक्तव्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात जयंत पाटील यांचा मुक्काम कुठेतरी असेलच, असे सूचक भाष्य प्रफुल पटेल यांनी केले. ते सोमवारी एबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते. 


यावेळी प्रफुल पटेल यांना जयंत पाटील यांच्या पक्षांतराविषयी सुरु असलेल्या चर्चांविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर प्रफुल पटेल यांनी म्हटले की, आम्ही सगळेजण गेल्या 25-30 वर्षांपासून एकत्र काम करतोय. आमच्यात प्रेमाचे संबंध आहेत. पक्ष बदलला म्हणून ते एका रात्रीत संपणार नाहीत किंवा आम्ही एकमेकांना एका दिवसात विसरु, असे होणार नाही. आम्हाला आजही एकमेकांबद्दल सगळं माहिती असते, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. यावर पटेल यांना जयंत पाटील भाजपमध्ये जातील की तुमच्या पक्षात येतील, अशी विचारणा झाली. त्यावर पटेल यांनी म्हटले की, आमची तर इच्छा आहे की, जयंत पाटील यांनी आमच्यासोबतच यावे. पण आता ठीक आहे. पण कुठेतरी त्यांचा मुक्काम असेल, असे सूचक भाष्य प्रफुल पटेल यांनी केले. यावर आता जयंत पाटील काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल.


मी लोकसभा निवडणूक लढायला कधीही तयार- प्रफुल पटेल


मी राज्यसभेवर निवडून गेलो असलो तरी मी कधीही लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे. भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवण्यासाठी मला कोणत्याही तयारीची गरज नाही. पण माझ्यासारख्या जबाबदार नेत्याने भान ठेवून बोलणे आवश्यक आहे. आम्ही आता महायुतीमध्ये आहोत. जोपर्यंत महायुतीची तिकीटवाटपाची चर्चा होत नाही, त्यापूर्वीच मी भंडारा-गोंदियाच्या जागेवर दावा करु शकत नाही. याठिकाणी भाजपचा विद्यमान खासदार आहे. भाजपने भंडारा-गोंदियाची जागा आमच्यासाठी सोडली तर मी तेथून निवडणूक लढवेन. राज्यसभेवर दुसऱ्या कोणालातरी पाठवता येईल, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.


शरद पवार गटातील बड्या नेत्यामुळे राज्यसभेची उमेदवारी जाहीर करायला वेळ लागला का?


प्रफुल पटेल हे अजित पवार गटाकडून नुकतेच राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. मात्र, त्यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आली होती. शरद पवार गटातील एक बडा नेता अजित पवार गटात येणार असल्याने त्याच्यासाठी राज्यसभेची उमेदवारीची घोषणा थांबवण्यात आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. याविषयी प्रफुल पटेल यांना विचारले असता त्यांनी एका बड्या नेत्याशी बोलणी सुरु असल्याची बाब मान्य केली. हा नेता आमच्या पक्षात आला असता तर त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली गेली असती. येत्या दोन महिन्यात पुन्हा राज्यसभेची निवडणूक होत आहे. आम्ही तोपर्यंतही वाट पाहू, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. तो बडा नेता म्हणजे सुप्रिया सुळे याच होत्या का, असा प्रश्न पटेल यांना विचारण्यात आला. मात्र, त्यावर स्पष्टपणे बोलण्यास प्रफुल पटेल यांनी नकार दिला. 


आणखी वाचा


जयंत पाटील एकटे जाणार की "सगेसोयरे" घेऊन जाणार? प्राजक्त तनपुरेंचं मोठं वक्तव्य