मुंबई : राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं आहे. महिला अत्याचार, बीड हत्याकांड, व्हायरल व्हिडिओ आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यावरुन सभागृहात गदारोळ सुरू असल्याचे दिसून येते. त्यातच, महायुतीमध्येही आलबेल नसल्याचे वृत्त सातत्याने झळकत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अर्थात, आमच्यात कुठलाही नाराजी नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) घेण्यात आलेल्या काही निर्णयांमुळे पुन्हा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच, आज निती आयोगाच्या धरतीव राज्य सरकारने स्थापन केलेल्या 'मित्रा' संस्थेच्या उपाध्यक्षपदावरुन एकनाथ शिंदेंचे खास असलेल्या अजय अशर यांना हटविण्यात आल्याने पुन्हा तीच चर्चा होत आहे. दरम्यान, या चर्चेवर बोलताना, मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाही... असे म्हणत फडणवीसांनी माध्यमांना लक्ष्य करत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
गेल्या काही काळामध्ये माध्यमांची एक आवडती बातमी झालीय, काही झालं तरी फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. पण, एक लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरिता मी उद्धव ठाकरे नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेना टोला लगावला. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला, त्यावेळी उपस्थित महायुतीच्या आमदारांनी बाक वाजवून दाद दिली. राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र. 'मित्र'च्या (Mitra) उपाध्यक्षपदी अजय अशर या बिल्डरची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिलाय. अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन हटवण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने माध्यमांमध्ये वृत्तांकन करण्यात आलं होतं. फडणवीसांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना धक्का दिलाय, अशा बातम्या झळकल्या. त्यावरुन, बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
कोण आहेत अजय अशर
बिल्डर अजय अशर हे ठाण्यातील बडे प्रस्थ असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघ किसननगर येथे त्यांनी अनेक इमारती बांधल्या आहेत. अशर हे काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे मित्र होते. मात्र, 2000 मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत सक्रिय झाले. शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदे सभागृह नेतेपदी पोहोचले, त्यावेळी अशर यांनी शिंदेंसोबत जवळीक साधली होती. शिंदे आमदार झाल्यानंतर ही जवळीक घट्ट मैत्रीमध्ये बदलली. त्यानंतर ठाण्यातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प असो वा रिडेव्हलपिंगचे प्रोजेक्ट असो अशर यांना प्राधान्य मिळण्यास सुरुवात झाली. तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांची नियुक्ती केली होती.