Lok Sabha Election 2024: गुजरातमध्ये भाजपने विक्रमी विजय मिळवला असला तरी हिमाचल आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीच्या निकालांनी भाजपची निराशा केली आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. भाजपला एकीकडे दिल्लीत 15 वर्षानंतर सत्तेतून बाहेर पडावे लागले, तर दुसरीकडे हिमाचलमध्येही पक्षाला सत्ता गमवावी लागली. 2022 च्या एमसीडी निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर दुसरीकडे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला 77 जागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत आम आदमी पक्षाला 85 जागांचा फायदा झाला आहे. मात्र गुजरातमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक विजय नोंदवला आहे.


या वर्षीच्या सर्व निवडणुका झाल्या आहेत. पण आता या निवडणुकांचा परिणाम 2023 च्या विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या तीन निवडणुकांचे निकाल पाहता, हिमाचल आणि एमसीडी निवडणुकीत भाजपच्या पराभवाचा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या निकालांमुळे भाजपला आपली रणनीती बदलावी लागेल का? हे देखील पुढे पाहायला मिळणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळवायचा असेल, तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चमकदार कामगिरी करावी लागेल. त्यासोबतच हिमाचल आणि एमसीडीमधील पराभवातूनही खूप काही शिकावे लागेल. हिमाचल आणि एमसीडीमधील पराभवानंतर भाजपसमोर कोणती आव्हाने आहेत? हे जाणून घेऊ...


दिल्लीत भाजपसमोर आप पक्षाचं आव्हान आहे. कारण एमसीडीमधील पक्षाची कामगिरी पाहता यावेळी भाजपच्या लोकसभेच्या जागा दिल्लीत कमी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असलं तरी लोकसभा निवडणूक 2014 आणि 2019 मध्ये सर्व प्रयत्न करूनही केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्लीतील जनतेचा पाठिंबा मिळू शकला नाही. अशातच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा आपली चांगली कामगिरी दाखवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


2024 मध्ये भाजपला आपला बालेकिल्ला कुठे-कुठे वाचवावा लागेल?


लोकसभा निवडणुकी 2024 च्या बाबत भाजपचे गांभीर्य पाहता, लक्षात येते की, गुजरातमध्ये पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात 2024 च्या निवडणुकीच्या तयारीची झलक होती. सध्या भारत आर्थिक समस्या, महागाई आणि अशा अनेक समस्यांशी झुंजत आहे. या सर्वांचा 2024 च्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षालाही अनेक राज्यांतील आपला बालेकिल्ला वाचवावा लागणार आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका भाजपसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहेत.


उत्तराखंडमध्ये भाजपकडे लोकसभेच्या 5 जागा आहेत आणि भाजपला पुन्हा सर्व जागा जिंकायच्या आहेत. यानंतर उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 पैकी 62 जागा भाजपकडे आहेत. येथेही भाजपसमोर अखिलेश यादव यांचे मोठे आव्हान आहे. भाजपला येथेही आपला बालेकिल्ला वाचवावा लागणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने हरियाणातील सर्व 10, आसाममधील 14 पैकी 9, गुजरातमधील सर्व 26 आणि गोव्यात 2 पैकी 1 जागा जिंकल्या. या सर्व राज्यांमध्ये भाजपला आपला बालेकिल्ला वाचवावा लागणार आहे. या राज्यांचे निकाल भाजपचे भवितव्य ठरवतील.


महाराष्ट्रात भाजपला मिळणार कडवी टक्कर?


बिहार भाजपच्या हातातून गेला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 23 जागा भाजपकडे आहेत. भाजपला 27.6 टक्के मते मिळाली. पुन्हा राज्यात परतणे हेही भाजपसाठी मोठे आव्हान आहे. यातच 2014 आणि 2019 ची लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र मिळून लढले होते. मात्र शिवसेनेत दोन गट पडले आहे. ज्यातील शिंदे गट हा भाजपसोबत असून त्यांच्याकडे 12 खासदार आहेत. तर ठाकरे गट हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत महाविकास आघाडीत आहे. 2024 मध्ये भाजपला महाविकास आघाडीकडून कडवी टक्कर मिळू शकते.