Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले होते. त्यात त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचे दिसून आले होते. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या स्टेट्समुळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर आज शिक्कामोर्तब झाले असून रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. ते शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत असून यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
रवींद्र धंगेकर यांनी राजीनामा देताना म्हटले आहे की, मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नाते तयार झाले आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्षातील लोकांनी माझ्यासाठी कष्ट केले. सर्वांनी माझ्याबरोबर ताकद उभी केली होती. त्यामुळेच आता पक्ष सोडताना मला खुप दुःख होत आहे, असे त्यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
याबाबत विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मी धंगेकरांबद्दल इतकच बोलेल की, धंगेकर कोण होतास तू , काय झालास तू...!" खरंतर अनेक दिवसांपासून धंगेकर जाणार अशा चर्चा होत्या. पक्षाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी हा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाचा एक बळी आहे. शिवसेनेने त्यांना काही देऊ केलं असेल, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हा निराशाजनक अर्थसंकल्प : हर्षवर्धन सपकाळ
दरम्यान, नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्लाबोल केलाय. हे सरकार स्वतःला ट्रिपल इंजिन सरकार म्हणून म्हणवून घेते. मात्र अर्थसंकल्पात या सरकारने महाराष्ट्राला फसवलं आहे. अनेक मोठ्या मोठ्या घोषणा अर्थसंकल्पापूर्वी सरकारने केल्या. मात्र, त्यात अर्थसंकल्पात तरतुदी नाहीत. एकंदरीत सरकारने शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना व महाराष्ट्राला फसवलं आहे. त्यामुळे हा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.