Gulabrao Patil on Rohit Pawar : आम्ही राजकीय पक्ष फोडतो तसे तुम्ही शाळा चालविण्यासाठी विद्यार्थी फोडा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना दिला होता. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकार आता विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्यामागे देखील ईडी, सीबीआय आणि आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावणार का? असा सवाल उपस्थित केला होता. यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहित पवार यांना सणसणीत टोला लगावलाय. रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला व सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलं पोट्ट आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते? असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
गुलाबराव पाटील यांनी 12 एप्रिल रोजी एका कार्यक्रमात भाषण करताना जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या कमी असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र ही अपेक्षा व्यक्त करताना आम्ही ज्या पद्धतीने पक्षातील लोक फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय ED, CBI, IT च्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटते आहे? मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असे म्हणत रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती.
गुलाबराव पाटलांचा रोहित पवारांना टोला
आता रोहित पवारांच्या टीकेवर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला व सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेलं पोट्ट आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते? पूर्ण भाषण ऐकलं नाही. अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी आधी भाषण तपासून घ्यावे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावलाय. आता गुलाबराव पाटील यांच्या केलेल्या टीकेवर रोहित पवार काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आमदार होणं सोपं पण सरपंच होणं एवढं सोपं नाही, जळगावमध्ये गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी