मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली असून महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) व महायुतीमध्ये जागावाटपाच्या अंतिम वाटाघाटी सुरू आहेत. त्यात, महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील विधानसभेच्या सर्वाधिक जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत उतरणार आहेत. मात्र, महाविकास आघाडीमध्ये समाजावादी पक्षानेही (Samajwadi party) इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी, मुंबईतील अनुशक्ती नगर येथील विधानसभेच्या जागेवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. अबू आझमी यांच्या पक्षातर्फे फहद अहमद हे इच्छुक उमेदवार असून त्यांच्यासाठी समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीमध्ये अनुशक्ती नगरची (Anushakti nagar) मागितली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाची एंट्री होणार का, सपाला ती जागा सुटणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


मुंबईतील अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाकडून फहद अहमद विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची सुत्रांची माहिती आहे. फहद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती असून त्यांच्यावर सध्या समाजवादी पक्षाची युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रची जबाबदारी आहे. त्यामुळे, राज्यात समाजवादी पक्षाकडून ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अनुशक्ती नगरमधून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे आमदार आहेत. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रीय आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीमध्येही राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून या जागेवर दावा केला जाऊ शकतो. तसेच, शिवसेना ठाकरे गटाकडूनही दावा केला जाणार आहे. कारण, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेतील उमेदवाराल येथे द्वितीय क्रमांकाचे मताधिक्य मिळाले आहे.


अणुशक्ती नगरमधून सध्या आमदार कोण?


अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक 65,217 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दोघांमधील विजयाचे अंतर 12,751 मतं एवढं आहे.  तर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे 39,966 मते मिळवून विजयी झाले होते. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाची पुढील निवडणूक ऑक्टोबर 2024 मध्ये आहे.


हेही वाचा


सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खून; बदलापूर प्रकरणी असीम सरोदेंची हायकोर्टात याचिका