मुंबई : शिक्षकांना निवडणुकीच्या कामात (Teachers Election Duty) ड्युटी लावण्यासंदर्भात मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, याची दखल घेत निवडणूक आयोगाने (Election Commission) शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) फेसबुक पोस्ट करत समाधान व्यक्त केले आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शालेय शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा मुद्दा चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मीडियासमोर मांडला होता. राजसाहेबांच्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन "कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये" अशी भूमिका आग्रहपूर्वक मांडली आणि केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था उभारताना माजी शासकीय कर्मचारी आदींनाही सामावून घ्यावे, अशी सूचना केली होती.
आता शिक्षक वर्गांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिकवू शकतील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आग्रहामुळे काल रात्री उशिरा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तातडीची बैठक बोलावली. शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी अधिगृहीत करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा असा आदेश दिला आहे. इच्छुक सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना BLO ड्यूटी देण्याबाबतचा पर्याय वापरण्यात यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस निवडणुकीशी संबंधित कामावर नियुक्त केल्यास त्यांना त्यांच्या शैक्षणिक कामाच्या दिवशी व वेळेस निवडणुकीचे काम दिले जाणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात यावी असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. या आदेशामुळे आता यापुढे निवडणुकीच्या दिवसांतही शिक्षक वर्गांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिकवू शकतील, असे अमित ठाकरे म्हणाले. तर, राजसाहेबांच्या मनसेने त्वरित हस्तक्षेप केल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखता येण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने खुला झाला, याचे समाधान वाटते, असेही अमित ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले होते खडेबोल
निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो, तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या :