मुंबई : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे, राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटातील उमेदवार आपल्या पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली. त्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) राजकीय संग्राम सुरू झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच, आजच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता एकही शिवसेनेचा मंत्री उपस्थित नव्हता. मात्र, यामागे नेमकं कारण काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रालयात संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेना शिंदे गटाने अघोषित बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट बैठक होते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला यापैकी एकही मंत्री गेला नाही. केवळ एकनाथ शिंदे उपस्थित होते. विशेष म्हणजे कॅबिनेटची बैठक आटोपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले. या दालनात सध्या देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरु आहे. त्यामुळे, शिवसेना नेते आणि मंत्र्‍यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय याची चर्चा होत आहे. त्यानुसार, प्राथमिक माहितीनुसार शिंदेंच्या मंत्र्‍यांच्या नाराजीची 6 कारणे समोर आली आहेत. 

शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीची कारणे 

1. भाजप सेनेचे नेते ,नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत

Continues below advertisement

2. विधानसभेला ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवाराला भाजप आपल्या पक्षात घेत आहे. 

3. शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात, तसेच निधी देखील वळवला जातो 

4. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपकडून युतीचा धर्म पाळला जात नाही. 

5. निधी मिळवण्यासाठी देखील शिवसेना आणि शिंदेच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

6. संभाजी नगर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतले जिथे युतीचा धर्म पाळला नाही. 

ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची टीका

हे सर्व विधिलिखीत आहे. ज्याक्षणी एकनाथ शिंदेंनी व्हाया सुरत-गुवाहाटीचा रस्ता पकडला होता. त्याक्षणी भाजप कशा पद्धतीने वापरुन घेईल, हे त्यांच्या कपाळावर लिहून ठेवलेलं होतं. उदय सामंत यांच्यासमोर त्यांनी राणेंचं घर फोडून त्यांनी राणेंसमोर एक आव्हान उभं केलंय. दादा भुसे यांच्यासमोर आता एक अद्वय हिरेंचं आव्हान उभं केलंय. ज्या पद्धतीने शिंदेंच्या आमदारांसमोर भाजप एक-एक आव्हान उभं केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आर्श्चय वाटायला नको. कारण एकनाथ शिंदेंनी स्वत:ला मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी या सगळ्यांना राजकीय आत्महत्या करण्यास भाग पाडले, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय समजूत काढतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इकडे येऊन सांगताय आम्हाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मागे भाजपने शुक्लकाष्ट लावलेलं आहे, त्यामुळे कुबड्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना पद्धतशीरपणे बाजूला काढण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला.

हेही वाचा

महायुतीच्या गोटात प्रचंड खदखद? कॅबिनेट बैठकीला शिंदे गटाच्या मंत्र्यांची अचानक दांडी, देवेंद्र फडणवीसांच्या दालनात काय घडलं?