छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांनी विकास केला, गेल्या दोन वर्षात आम्ही राज्याचा विकास केला, त्यामुळे जनता विकासाच्या बाजूने मतदान करत आम्हाला निवडून देईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही आम्हालाच जागा मिळतील असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. 


एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचं हक्काच मतदान आमच्या लोकांनी उतरवलेलं आहे, मतदानाचा तिसरा टप्पादेखील महायुतीच्या बाजूनेच आहे. राज्यात पार पडलेल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात महायुतीला जास्त जागा निघतील. तिसऱ्या टप्यात महायुतीला चांगलेच मेजॉरिटी मिळेल, बहुमत मिळेल. कारण दोन वर्षात  महायुतीने केलेले काम आणि दहा वर्षात मोदीजींनी केलेले काम यामुळे लोक शेवटी काम आणि विकासाकडे बघूनच मतदान करत असतात. 


आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवतोय


विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते वेगवेगळे संभ्रम पसरवत आहेत असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, संविधान बदलणार, हे करणार, ते करणार असंच विरोधकांचं सुरू आहे. ते कसाबच्या आणि करकरे यांच्याबद्दलच्या गोष्टीतून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ही जनता विकासाच्याच बाजूने मतदान करणार. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार संकल्प महाराष्ट्रातील जनतेने केलेला आहे. या निवडणुकीत जे महायुतीचं आमचं टार्गेट आहे ते आम्ही पूर्ण करणार.


बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय


एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, लोटांगण कोण घालतोय कुणी घालतंय हे जनतेला दिसतंय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचं त्यांनी सोडलंय, गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणायचं सोडलंय. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत, बाळासाहेबांच्या विचाराचे हे छत्रपती संभाजीनगर आहे. 


राज्यातील आज तिसऱ्या टप्प्यासाठी 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली. 


ही बातमी वाचा: