जळगाव : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षित निकाल लागल्यानंतर ईव्हीएमविरुद्ध (EVM) विरोधकांनी आवाज उठवला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा विजय ईव्हीएमचा असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देखील केली. तर, दुसरीकडे महायुतीने तब्बल 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर सरकार स्थापन करुन कामकाजही सुरू केले आहे. विधानसभेच्या निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यानुसार, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे. आता, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. पुढील दोन वर्षात सर्वात राहिलेल्या निवडणुका होणार असून ह्या निवडणुका युद्ध आहेत, या युद्धासाठी शस्त्रसाठी गोळा करा, असे एकनाथ खडसेंनी म्हटलं. 


पुढील दोन वर्षात राहिलेल्या सर्व निवडणुका होणार आहेत, या निवडणुका म्हणजे एक प्रकारचं युद्ध असणार आहे. या युद्धाच्या तयारीसाठी युद्धसामग्रीसह अस्त्र शस्त्राची आवश्यकता आहे, ते गोळा करा असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केले. मागील काळात विधानसभा निवडणुकीत यश मिळेल असं वाटत असताना, मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. मात्र, जनतेचा कौल मान्य करुन नव्या जोमाने आगामी निवडणुकांसाठी सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी मजबूत होणे गरजेचे आहे, कारण कमजोर माणसाला राजकारणात किंमत नाही. मजबूत माणसाला महत्व असल्याने, मजबूत होणे गरजेचे असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 


गिरीश महाजनांना टोला


पालकमंत्री पदासाठी सरकारमधील काही मंत्र्यांचे वाद विवाद असल्याचं सांगितलं जातं आहे. आपल्याला याच जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायचं आहे, असा हावरटपणा आणि आचरटपणा काही मंत्री करत आहेत. मात्र, हाच जिल्हा पाहिजे अशी मागणी करण्या माग रहस्य दडलं असल्याचं खडसे यांनी म्हटलं. खडसेंनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. मागील निवडणुकीत अपयश आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसत आहे. मात्र, राजकारणात हार-जीत होत असते, त्याचा अधिक विचार करत बसण्यापेक्षा पराभवाचे आत्मचिंतन करुन पुन्हा संघटन बळकट केले पाहिजे. सत्ताधारी पक्षाच्या सरकारमध्ये अनेक त्रुटी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जनतेच्या अनेक समस्या आहेत. या सगळ्या विरोधात आंदोलने, निदर्शने करा आणि सरकारला उघडे पाडले तर आगामी निवडणुकीत तुम्हाला यश मिळू शकणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा


दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत