बीड : राज्यातील ओबीसी (OBC) आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून मराठा समाजाच्या काही युवकांनी आत्महत्येसारखए टोकाचे पाऊल उचलले होते. त्यानंतर, आता ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी लातूर जिल्ह्यातील वांगदरी येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. लातूरच्या वांगदरी येथील भरत कराड याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनीही वागंदरी गावी जाऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केल होते. आता, भरत कराड याच्या कुटुंबीयाला राज्य सरकारने 25 लाखांची मदत करावी तसेच त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला पात्रतेप्रमाणे शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केली आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन याबाबतचे पत्र शेअर केले असून दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांनी कराड कुटुंबीयांची भेट घेतली होती आणि त्या कुटुंबाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली. दरम्यान, स्व. भरत कराड यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार असून त्यांच्या या बलिदानाने उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला राज्य सरकार न्याय देईल, असा विश्वासही धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे.
ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या नैराश्यातून वांगदरी ता. रेणापूर, जि. लातूर येथील स्व. भरत कराड (वय 35) या तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, भरत कराड यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून आपल्या नाथ प्रतिष्ठानच्यावतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. आरक्षण प्रश्नी सरकार सजग असून, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून लढा लढला जाईल, मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर कुणीही आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे कळकळीचे आवाहनही मुंडेंनी केले होते.
मांजरा नदीपात्रात घेतली उडी (Manjara river)
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील वांगदरी येथील रिक्षाचालक भरत कराड यांनी मांजरा नदीपात्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले. यावेळी, ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी घोषणाबाजीही त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ओबीसींच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.