Maharashtra Politics : दहीहंडी पाठोपाठ आता गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2022) निमित्ताने महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पन्नासहून अधिक घरगुती गणपतींना भेटी दिल्या. येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणूक असल्यामुळे ही मोर्चेबांधणी केली जात आहे.


आधी दहीहंडी आता गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी भेटी
पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे गेल्या दोन दिवसात देवेंद्र फडणवीस मुंबईभर फिरत आहेत. आधी दहीहंडीच्या उत्सवानिमित्ताने फडणवीस यांनी मुंबई पिंजून काढली होती. आता गणेश उत्सवाचं निमित्त करुन छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आहेत. 






 


बेस्ट बसवर भाजपच्या जाहिराती
एकीकडे सण उत्सवाच्या निमित्ताने जोरदार भेटीगाठी सुरू आहेत तर दुसरीकडे मुंबईभर भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली. बेस्ट बस आणि बस स्टॉपवर बॅनर झळकले. मुंबई भाजपच्यावतीने बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये 'आपले सरकार आले...हिंदू सणांवरचे विघ्न टळले' अशी ओळ आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. तर एका बाजूला भाजपचे निवडणूक चिन्ह 'कमळ' आहे. या जाहिरातीमधून आधीच्या सरकारच्या काळात हिंदू सणांवरच निर्बंध होते, असे सुचवण्यात येत असल्याची चर्चा आहे. 


आदित्य ठाकरेंची मोजक्या नेत्यांच्या घरी हजेरी
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्ता गेल्यानंतर सगळीकडे फिरतील अशी अपेक्षा होती पण तसे झालं नाही, काही मोजक्या नेत्यांच्या घरी आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. सत्तांतरानंतर पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. परंतु गणेशोत्सवात ते कुठे फारसे फिरले नाहीत. 


जनतेचा आशीर्वाद कोणाला? 
राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे. ही मिळालेली सत्ता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सण उत्सवाच्या माध्यमातून नेतेमंडळी करताना दिसतात. त्यात मुंबई, पुण्यासह प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आधी कृष्णाचा आशीर्वाद आणि आता गणरायाचा आशीर्वाद मागत नेतेमंडळी फिरत आहेत. पण जनतेचा आशीर्वाद नेमका कोणाला मिळतो हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल.


Devendra Fadnavis CM Eknath Shinde यांच्या घरी गणपती दर्शनासाठी दाखल : ABP Majha