मुंबई: देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबईतील वरळी ते मरिनलाईन्स सागरी सेतू मार्गाच्या (Coastal Road) पहिल्या टप्प्याचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. गेल्या काही काळात कोस्टल रोडच्या श्रेयवादावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपमध्ये सातत्याने वाद रंगला आहे. याचे प्रत्यंतर सोमवारी कोस्टल रोडच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी देखील आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोस्टल रोडच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditay Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. तसेच ठाकरेंवर अनेक गंभीर आरोपही केले.


देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोस्टल रोड प्रकल्प मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी अश्विनी भिडे आणि इक्बालसिंह चहल यांची मुक्तकंठाने प्रशंसाही केली. अश्विनी भिडे यांनी कोस्टल रोड प्रकल्पातील अनेक अडचणी सातत्याने पाठपुरावा करुन दूर केल्या. त्यांनी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला नेतृत्त्व दिले, असे फडणवीसांनी म्हटले. तर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर इक्बालसिंह चहल यांनी या प्रकल्पात गो गेटरची भूमिका बजावली. अत्यंत वेगाने काम करण्यासाठी त्यांनी मदत केली, याबद्दल अभिनंदन, असे फडणवीस यांनी म्हटले.काही लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करुन कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रकल्पाच्या कामाला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेग आला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर फडणवीसांचे गंभीर आरोप


देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोस्टल रोडच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कशाप्रकारे वसुली करायचे याचा तपशील मांडला. आजच्या या कार्यक्रमाला अजित गुलाबचंद आणि एल अँड टी चे देसाई साहेब उपस्थित आहेत. हे दोघे कधीही बोलणार नाहीत. कारण या दोघांना जन्मभर काम करायचे आहे. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. अजित गुलाबचंद आणि देसाई साहेबांची काही माणसं तेव्हा माझ्याकडे सातत्याने यायची आणि मला तक्रारी सांगायची. मुख्यमंत्री महोदयांनी कोस्टल रोडचे काम कसे करायचे हे त्यांना सांगितले होते. ते अधिकारी मला सांगायचे की, कोस्टल रोडच्या कामात कशाप्रकारे वसुली सुरु आहे. आम्हाला याठिकाणी एकही काम करता येत नाही. कुठे खोदायचे असेल किंवा ट्रक न्यायचा झाला तरी वसुली केली जाते. कोस्टल रोडमध्ये आमच्याच लोकांना विशिष्ट रेटने काम द्या, असे सांगितले जायचे. त्यावेळी या भागात कोण आमदार होते, हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याविषयी बोलणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. 


या सगळ्यामुळे कोस्टल रोडचे काम करणाऱ्यांवर दबाव होता. हा रस्ता पूर्ण झाला कारण राज्यात सत्ताबदल होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. नाहीतर आणखी दोन-चार वर्षे कोस्टल रोडचे बांधकाम रखडले असते. पण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व सूत्रे हातात घेतली, अडचणी दूर केल्या. जे लोक ब्लॅकमेलिंग करत होते, त्यांनाही दूर केले. यानंतर कोळी बांधवांनी कोस्टर रोडच्या दोन खांबांमधील अंतर वाढवण्याची विनंती केली. ते उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी कोळी बांधवांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. याउलट एकनाथ शिंदे यांनी बैठक लावून कोळी बांधवांची खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी मान्य केली. एकनाथ शिंदे खंबीर होते म्हणून कोस्टल रोडचे काम इतक्या वेगाने होऊ शकले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.



मी सगळं करुनही  उद्धव ठाकरेंनी मला कोस्टल रोडच्या भूमिपूजनालाही बोलावले नाही: देवेंद्र फडणवीस


कोस्टल रोड बांधताना नेहमी सीआरझेडचे नियम आडवे यायचे.  सीआरझेडचा विषय होता त्यावेळी मागच्या सरकारमधले दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे. मी सत्तेत असताना पुढाकार घेतला. आम्ही केंद्राला शब्द दिला होता की, आम्ही या ठिकाणीं सगळी ग्रिनरी करु.नरेंद्र मोदी यांनी सांगून देखील काही अधिकारी अडचणी आणत होते. अनिल माधव दवे आजारी असताना देखील एका बैठकीसाठी आले आणि त्यांच्यामुळे फायनल नोटीफिकेशन निघालं. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या मात्र आम्ही सगळीकडे जिंकलो. आणि आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही केलं आम्ही केले. मी सगळं करून आणलं परंतु ज्यावेळी भूमिपूजन करायचं होतं त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, परंतु उद्धवठाकरेंनी मला बोलवलंदेखील नाही. त्यावेळी मी सगळं रोखू शकलो असतो. परंतु मी तसे केले नाही. अरे एक देवेंद्र फडणवीस येईल आणि जाईल परंतु नाव कायम राहील. कोण कोत्या मनाचे आणि कोण मोठ्या मनाचे, हे आता पाहायला मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


आणखी वाचा


निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम, कोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल