परभणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जगाला तोंडात बोटं घालायला लावणारी कामगिरी केली आहे. त्यांनी देशातील 25 कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणलं. गेलाय 10 वर्षांमधील ही कामगिरी म्हणजे फक्त ट्रेलर आहे. येत्या 5 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी (PM Modi) भारताचा आणि देशाचा चेहरामोहराच बदलून टाकतील, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव गेला. महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस याठिकाणी आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परभणीकरांना महादेव जानकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी मला महादेव जानकारांना संदेश द्यायला सांगितला आहे की, 'जानकरजींना सांगा, मी 18 व्या लोकसभेत त्यांची वाट पाहत आहे', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात झोकात केली.


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुक्तकंठाने पंतप्रधान मोदी यांची तारीफ केली. आधी महादेव जानकर यांचे कौतुक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात कशाप्रकारे आमुलाग्र बदल केले, याची जंत्रीच वाचली. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने मोदीजींच्या झोळीत 41 खासदार घातले. यंदा आम्ही हा रेकॉर्ड मोडणार आहोत. या खासदारांमध्ये पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांचा समावेश असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


फडणवीसांच्या भाषणात 'सबकुछ मोदी'


गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारत बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 2014 पर्यंत प्रत्येकजण गरिबीविषयी बोलायचा, पण देशात पहिल्यांदा कोणी खऱ्या अर्थाने गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत.  गेल्या 10 वर्षांमधील भारताची कामगिरी पाहून संपूर्ण जग आश्चर्याने तोंडात बोटं घालत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर काढलं. जगातील अर्थतज्ज्ञ म्हणतात की, भारतामध्ये हे काय आश्चर्य झालं. जे विकसित देशांना जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं. मोदीजींनी हे कसं केलं, हा प्रश्न सगळ्यांना पडला. पंतप्रधान मोदींना हे जमलं कारण, त्यांनी मुठभर लोकांसाठी काम केले नाही. त्यांनी गरिबांच्या घरात वीज,पाणी,सिलेंडर या सुविधा मिळतील, हे पाहिले. तसेच आमच्या महिलांना शौचालय, मुद्रा लोन, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासातंर्गत तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केले. मोदीजी म्हणतात की, 10 वर्षांमध्ये देशात झालेले हे परिवर्तन हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्याप्रकारे बदलणार आहे, त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


आणखी वाचा


महादेव जानकरांना सांगा, मी तुमची वाट बघतोय! पंतप्रधान मोदींनी फडणवीसांकडे पाठवला खास संदेश, मोदी नेमकं काय म्हणाले?