मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त नागरी सत्कार समारंभ पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलखुलास राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक दशके एका विचाराकरिता समर्पित असे जीवन जगले, जनसामान्यांचे नेते म्हणून सातत्याने आपली राजकीय कारकीर्द चालवली, अशा भारत सरकारच्या राज्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 

Continues below advertisement

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचे व्यक्तिमत्त्व हे संघर्षातून घडले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रसंगी महत्त्वाची भूमिका निभावत लोकाभिमुख पद्धतीने त्यांनी संघर्ष उभा केला. राजकारणात आल्यानंतरही त्यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून कधीही फारकत घेतली नाही. तसेच संघर्षातून नेतृत्व तयार झाले असले तरी त्यांच्यामध्ये कोणत्याही व्यक्ती, पक्षाबद्दल किंवा धर्माबद्दल कटुता आली नाही. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचा सर्वपक्षीय जिव्हाळा कायम आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या सहकार्याने ज्यांनी भारताला संविधान दिले, त्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याची संधी महाराष्ट्र सरकारला मिळाली. तसेच, जपानमधील कोयासन विद्यापीठातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच लंडनमधील त्यांच्या घराच्या लिलावाचा प्रश्न सोडवण्यासाठीदेखील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

Continues below advertisement

रामदास आठवले यांच्या खासदारकीची आठवण

देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात एक जुनी आठवण सांगितली, ते म्हणाले, खरं म्हणजे मी ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झालो त्यावेळी आठवले साहेब हे नुकतेच महायुतीमध्ये आले होते. तेव्हापासन त्यांचं माझा संबंध जुळला त्याच्या आधी महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व एक नेते अशा पद्धतीने मी आठवले साहेबांना ओळखायचो पण प्रत्यक्ष त्यांची फारशी माझी ओळख नव्हती. पण त्या काळामध्ये ओळख झाली नंतर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला आठवले साहेबांना राज्यसभेवर पाठवायच आहे. त्यावेळी प्रकाशजी जावडेकर त्या जागेवर होते. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की मुंडे साहेब आणि मी दिल्लीला गेलो, दिल्लीमध्ये भाजपचे जे सर्व नेते होते राजनाथ सिंग असतील व्यंकय्या नायडू असतील,अडवाणीजी असतील अशा सर्व नेत्यांना आम्ही भेटलो आणि आम्ही सांगितलं की आठवले साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व आज आपल्या महायुतीत आलय आणि निश्चितपणे त्यांना आपण राज्यसभेवर पाठवलं पाहिजे.रामदास आठवले यांच्या राज्यसभेवर जाण्याने महाराष्ट्रात एक मोठा परिणाम होईल, येणाऱ्या लोकसभेमध्ये त्यानंतर विधानसभेमध्ये निश्चितपणे जो आमचा संपूर्ण आंबेडकरी समाज आहे त्या समाजाच्या मनामध्ये आपल्या महायुवतीच्या बद्दल एक विश्वास देखील तयार होईल. मला अतिशय आनंद आहे की त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी ऐकलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.