मुंबई : राज्य सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin yojana) योजनेची सध्या राज्यात चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेसाठी महिला भगिनींकडून गर्दी करुन अर्ज भरले जात आहेत. दुसरीकडे या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. सत्ताधारी योजनेचं महत्त्व पटवून देत आहेत, तर विरोधक योजनेवरुन टीका करत आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन आज गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या निवडणुकीत पुण्यातील बालेवाडी येथे होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यातील भाजपचे (BJP) आमदार, खासदार आणि पदाधिकारी पुण्यात आले आहेत. त्यावेळी, बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. राज्य सरकारने विविध योजना राबवल्या असून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय दिला जात आहे. महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजनाही आपल्या सरकारने सुरू केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीवरुन विरोधकांकडून खोटा नॅरेटीव्ह पसरवला जात आहे, विशेष म्हणजे हेच या योजनेचा विरोध करत असून हेच योजनेसाठी महिलांचे अर्ज भरुन घेत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले.
यांना पुन्हा एकदा सत्तेत येऊन आपल्या सर्व योजना बंद करायच्या आहेत. आपण लाडकी बहीण योजना आणली. पण, विरोधक किती लबाड आहेत बघा, या योजनेला सभागृहात विरोध करतात आणि गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपलं लावतात. माझं कार्यकर्त्यांना सांगणे आहे की, ही योजना आपली आहे. आपल्या लोकांनी महिलांचे अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यातून केले. तसेच, विरोधकांची रणनीती आहे की महिलांचे अर्ज भरून घ्यायचे आणि सरकारला ते द्यायचे नाही. ही योजना फसेल यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोपच फडणवीसांनी केला आहे.
फुल बॅटिंग करा, लग्नात गेलं तर योजना सांगा
आपल्याविरुद्ध नरेटीव्ह तयार होतो, पण आपले लोक उत्तर देत नाहीत. आपले लोक उत्तर देत नाहीत, आदेशाची वाट बघतात. मी आज आदेश देतो, फुल बॅटिंग करा, आदेश विचारू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा. फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका, असे आवाहनच फडणवीसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं आहे. तसेच, आपल्या योजना लोकांना सांगा, कुणाच्या लग्नात गेलात तरी आपल्या योजना सांगा. आपली मेमरी खूप शॉर्ट असते पण सातत्याने तुम्ही योजना सांगा, काही चार-पाच लोक खोटे नरेटीव्ह पसरवत होते, पण त्यांच्या मागे काही शक्ती आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले.
मोदींनी आरक्षणाची मर्यादा वाढवली
मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली, पण एक खोटा नरेटीव्ह तयार केला की हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार. पण, खोटं फार काळ टिकत नाही, खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली. विधान परिषदेत आम्ही टाचणी लावली आहे. हे म्हणत होते महायुतीचे आमदार फुटणार, अरे तुमचे 20 कधी फुटले हे तुम्हाला कळले देखील नाही, असे म्हणत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला काँग्रेसवर फडणवीसांनी निशाणा साधला.