अकोला: राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा प्लॅन रचला होता, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. शिंदे गटातील एका आमदारानेच मला ही माहिती दिली. त्याने सांगितले की, तुम्ही ज्यावेळी सुरतमध्ये होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: तुम्हाला ठार मारण्याचे षडयंत्र रचले होते. शिंदे गटासोबत सत्तास्थापन करण्याच्या प्लॅनमध्ये मी अडथळा ठरत असल्याने फडणवीस यांना माझा गेम करायचा होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुरतमध्ये असताना मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावाही नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला. ते शुक्रवारी अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टी करताना विचार करायला पाहिजे. वेळ आल्यावर आम्ही अशा लोकांचा हिशेब चुकता करु. आम्ही मरणाला न घाबरणाची माणसे आहोत, असेही देशमुख यांनी म्हटले.
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येबाबत देशमुखांना वेगळाच संशय
ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या हत्येबाबत नितीन देशमुखांनी एक वेगळीच थिअरी मांडली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याचीही नंतर कुणीतरी हत्या केली असावी, असं मला वाटतं. यात कुणीतरी तिसऱ्या माणसाचाही हात असावा, अशी दाट शंका मला असल्याचे नितीन देशमुख यांनी म्हटले.
नितीन देशमुख सुरतमध्ये असताना काय घडलं होतं?
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांचा जो एक गट केला होता, त्यामध्ये नितीन देशमुख यांचा समावेश होता. मात्र, सुरतमध्ये नितीन देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांच्या छातीत वेदना होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांकडे दिली होती. काही दिवसांनी नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर आरोप केले होते. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार नसल्याने सुरतमध्येच माझा घात करण्याचा भाजपचा डाव होता. रुग्णालयात मला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन टोचण्यात आले. माझ्या मागे पोलीस लावण्यात आले. तसेच डॉक्टरांच्या मदतीने मला ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असे आरोप नितीन देशमुख यांनी केले होते.
आणखी वाचा
शिंदेंसोबत सूरतला गेले, पण गुवाहाटीला जाण्यापूर्वीच ठाकरेंकडे परतले; नितीन देशमुख ठरले पात्र