Devendra Fadnavis And Sadhguru: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत गेटवे ऑफ इंडिया, मुंबई  येथे 'दिव्यज फाउंडेशन'च्या वतीने आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' कार्यक्रम संपन्न झाला. शहीदांना आदरांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना वंदन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दिव्यज फाउंडेशनचे अभिनंदन केले. दिव्यज फाउंडेशनच्या वतीने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि समाजकल्याण या क्षेत्रांत गेल्या काही काळापासून सातत्याने अतिशय उल्लेखनीय कार्य केले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान कार्यक्रमात ईशा फाउंडेशनचे संस्थापक पद्मविभूषण सद्गुरू यांच्याशी देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं सद्गुरू यांनी दिली. 

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांचा प्रश्न: तरुणांसमोर करिअर, सोशल मीडिया आणि अपेक्षांचा वाढता दबाव असताना जीवनात संतुलन आणि उद्देश कसा साधावा?सद्गुरू उत्तर: तणाव आणि दुःख हे बाह्य परिस्थितीपेक्षा स्वतःचे मन, विचार आणि भावना नियंत्रित न करता येण्यामुळे निर्माण होते. स्वतःची आंतरिक स्थिती सांभाळायला शिकणे महत्त्वाचे.

मुख्यमंत्र्यांचा प्रश्न: राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी एक सल्ला काय द्याल?सद्गुरू उत्तर: राजकारण्यांनाही माणूस म्हणून समजून घेण्याची गरज आहे. योग्य धोरणे आखून समाजाला दिशा देणे हे राजकारणाचे खरे उद्दिष्ट आहे.

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांचा प्रश्न: आजूबाजूला गडबड आणि मतमतांतरे असताना शांतता आणि संयम कसा राखता?सद्गुरू उत्तर: स्वतःच्या आनंदाची आणि शांततेची जबाबदारी इतरांवर सोपवू नका. बाह्य परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण नसले तरी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवता येते.

मुख्यमंत्र्यांचा प्रश्न: इतिहासातील कोणत्या व्यक्तीला भेटायला आवडेल?सद्गुरू उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याची इच्छा. त्यांच्या प्रशासन, युद्धनीती आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही जपलेल्या मानवी मूल्यांचा गौरव.

मुख्यमंत्र्यांचा प्रश्न:महाराष्ट्रातील पाणीटंचाई आणि दुष्काळावर वृक्षाधारित शेती हा उपाय ठरू शकतो का?सद्गुरू उत्तर: शेतजमिनींमध्ये वृक्षलागवड केल्याने मातीची गुणवत्ता सुधारते, पाणी जमिनीत मुरते आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होते. वृक्षाधारित शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते.

शांतता हा प्रगती आणि समृद्धीचा भक्कम आधार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis News)

शांतता हा प्रगती आणि समृद्धीचा भक्कम आधार आहे. विश्वास, विकास आणि व्यापकता त्याच समाजात नांदते, जिथे शांतता असते. शांतता टिकवण्यासाठी सरकारसोबतच समाजाचाही सहभाग महत्त्वाचा आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’च्या माध्यमातून समाजाच्या विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींचा गौरव होतोच, शिवाय त्यांच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे सर्वांनी मिळून शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक भक्कम करत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सद्गुरु यांची मुलाखत, VIDEO:

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी