Sushma Andhare : शिवसेना (Shiv Sena) विभागली गेली, शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिंदे गट बाजूला झाल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडण्याआधी सुद्धा दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर राजकारणात अॅक्टिव्ह होत्या. मात्र असं अचानक काय झालं या दोघी राजकारणात इतक्या घडामोडी सुरु असताना शांत झाल्या आहेत? तर दुसरीकडे ठाकरे गटात वादळी भाषण, वक्तव्य करणारा चेहरा सुषमा अंधारे यांच्या रुपात समोर आला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या झंझावातापुढे उर्मिला मातोंडकर, दीपाली सय्यद गेल्या कुठे? त्या सध्या काय करत आहेत? असे प्रश्न विचारले जात आहेत.
शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी अगदी काही महिन्यातच आपली एक वेगळी छाप पाडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या एक रणरागिणी म्हणून समोर आल्या आहेत. मात्र किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, निलम गोऱ्हे यांच्यासोबत आतापर्यंत सेलिब्रेटी रणरागिणी म्हणून शिवसेना ठाकरे गटात वावरणाऱ्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर नेमक्या कुठे आहेत ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर सध्या राजकीय घडामोडींपासून दूर
दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर ज्यांनी शिवसेनेची आतापर्यंत खिंड लढवली अनेक मेळाव्यात सभांमध्ये उपस्थिती दर्शवली इतकंच काय तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर वेळोवेळी सोशल मीडियाच्या किंवा आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून सडकून टीका करत विरोधकांचा समाचार घेतला. मात्र त्याच शिवसेनेच्या सेलिब्रिटी...शिवसेना ठाकरे गट संकटात असताना राजकीय घडामोडींपासून दूर राहणं पसंत केल्याचं चित्र आहे. दीपाली सय्यद यांनी तर शिंदे गट ठाकरे गट एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुद्धा केले मात्र त्यानंतर त्या सुद्धा या राजकीय घडामोडींपासून दूर झाल्या. त्यामुळे या चर्चांची कारण आम्ही विचारण्याचा यांना प्रयत्न केला. यावर उर्मिला मातोडकर यांनी अद्याप कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
सुषमा अंधारेंने सेलिब्रिटी रणरागिणींची उणीव भरुन काढली
दीपाली सय्यद यांनी आम आदमी पक्ष, शिवसंग्राम आणि त्यानंतर शिवसेना पक्षात प्रवेश करत आपली राजकीय कारकीर्द सुरु ठेवली आहे. तर उर्मिला मातोडकर यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत आपल्या राजकारणाचा प्रवास सुरु ठेवला. इतकंच काय तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या यादीतून उर्मिला यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळेल अशी चर्चा होती. पण शिंदेंच्या बंडानंतर सगळं बारगळलं. तर दुसरीकडे याच बंडानंतर ठाकरे गटाला सुषमा अंधारे यांच्यासारख्या फायर ब्रँड नेत्याचा चेहरा मिळाल्याने सेलिब्रिटी रणरागिणीची उणीव अंधारे यांच्याकडून भरुन काढली जात आहे.
त्या सध्या काय करतात?
शिवसेना विभागली गेली असताना ठाकरे गट आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा काम करत आहे. त्यात शिवसेनेच्या रणरागिणी किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, निलम गोऱ्हे या तर वेळोवेळी विरोधकांचा समाचार घेत आहेतच. पण त्याच पंगतीत पक्षात नुकत्याच आलेल्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांमध्ये आपली एक वेगळी छाप पाडली आहे. मात्र यामध्ये उणीव भासत आहे ती शिवसेनेच्या सेलिब्रेटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर यांची. त्यामुळे पक्षाला उभारी देण्याच्या अशा परिस्थितीत या दोघी नेमक्या कुठे आहेत? त्या सध्या काय करतात? हा प्रश्न चर्चिला जाणे स्वाभाविक आहे.