मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांची बदनामी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ एका डान्स बारमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत बारच्या तळघरातून काही बारबाला बाहेर पडताना दिसत आहेत. हा कॅफे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा असल्याचा मजकूर या व्हिडीओत लिहण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची बदनामी होत असल्याने ठाकरे गटाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे.
बारबाला बाहेर पडतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या कॅफेचा संबंध आदित्य ठाकरे यांच्याशी जोडण्यात आला होता. परंतु, यामध्ये तथ्य नसल्यामुळे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. काहीवेळापूर्वीच विनायक राऊत हे तक्रार घेऊन वांद्रे सायबर पोलिसांकडे गेले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांना एक पत्र देण्यात आले आहे. काही राजकीय आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. या व्हिडीओची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी, असे विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हा बार आदित्य ठाकरे यांच्या मालकीचा असल्याचा खोटा प्रचार करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी केली जात आहे. यामध्ये विकृत मनोवृत्तीची सत्ताधारी राजकारणी आहेत. त्यांची टोळी यामध्ये कार्यरत आहे जी या प्रकारची बदनामी करत आहे.
सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे सायबर पोलिसांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले आहे आणि तातडीने आम्ही कारवाई करू असं सांगितल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. सत्ताधाऱ्यांचा आयटी सेल आदित्य ठाकरेंच्या बदनामीचे काम करत आहे आणि पोलिसांना सुद्धा त्याच्याबद्दल माहित असेल त्यामुळे ती योग्य ती चौकशी करतील, असेही राऊत यांनी म्हटले.
या सगळ्या प्रकाराबाबत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत या प्रमुख नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या व्हायरल व्हिडिओबाबत ठाकरे थेटपणे बोलणार का, हे बघावे लागेल. तसेच या व्हिडिओबाबत सत्ताधारी पक्षातील नेते आणि पदाधिकारी काय बोलतात, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय?
बारबाला दिसत असलेला हा व्हिडीओ अंधेरीतील आहे. या कॅफेचे मालक उद्धव ठाकरे यांचा मुलगा आहे. समुद्रमंथनात जितकी रत्न बाहेर पडली नसतील तेवढी रत्न या बारच्या खोदकामातून बाहेर निघाली आहेत, असे या व्हिडीओत म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला?
दरम्यान, मुंबई पोलिसांनी 13 डिसेंबर 2021 ला मुंबईतील अंधेरी येथील दीपा बारमध्ये छापा टाकला होता. त्या बारमधील गोपनीय तळमजल्यावरुन 17 महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यासंदर्भातील बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या कारवाईचा व्हिडीओ आता कथित दावा करुन शेअर केला जात आहे.
आणखी वाचा
आदित्य ठाकरे तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकं कारण काय?