Dadar Kabutar Khana मुंबई: कबुतरखाना बंदीच्या (Dadar Kabutar Khana) समर्थनार्थ आज (13 ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलं आहे. याचपार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला आहे. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतर खाना परिसरातील दुकान दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 150 मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी पार्क, दादर, शाहू नगर, धारावी, व्हि बी नगर, माहिम, कुर्ला पोलिस ठाण्यातील पोलीस बंदोबस्ताला आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या पोलिसाचीही वाढीव कुमक या ठिकाणी बोलवण्यात आली आहे. कबूतरखाना परिसराला आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर छावणीचे स्वरुप पाहायला मिळत आहे.

मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस-

दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन जैनधर्मीयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठी एकीकरण समितीने मैदानात उडी घेतली होती. दादर कबुतरखाना बंद व्हावा, या मागणीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून बुधवारी दादर परिसरात आंदोलन केले जाणार होते. मात्र, काल रात्रीच मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस धाडण्यात आल्या. पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. 6 ऑगस्ट रोजी जैन आणि मारवाडी समाजाने पोलिसांनी धक्काबुक्की केली. सार्वत्रिक मालमत्तेच नुकसान केलं आहे. हजारो जण रस्त्यावर उतरले होते. सामान्य नागरिकांना त्यांनी वेठीस धरलं होते. याविरोधात मराठी माणसांनी काहीच करायचे नाही का, असा सवाल मराठी एकीकरण समितीचे  गोवर्धन देशमख यांनी उपस्थित केला आहे.

कबुतरखाना बंदीप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी-

दरम्यान, कबुतरखाना बंदीप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. महाधिवक्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. कबुतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने तज्ज्ञ समिती नेमण्याबाबतही कोर्टाच्या सूचना आहेत. या तज्ज्ञ समितीचीही आज कोर्टात घोषणा होण्याची शक्यता आहे. कबुतरखान्यासंदर्भातली बंदी कोर्टाने कायम ठेवलीय. त्यामुळे कोर्ट आता यापुढे नेमके काय निर्देश देणार याची उत्सुकता आहे. 

संबंधित बातमी:

दादरचा कबुतरखाना बंद झाला पण पक्ष्यांना खाणं पुरवण्यासाठी जैन समाजाकडून खास सोय, 12 कार सतत फिरत्या ठेवणार, नेमका काय प्रकार?

दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला जाळ्या का लावल्या? अखेर कारण आलं समोर...