नवी दिल्ली : एकीकडे राज्यात पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्यातच केंद्रीय लोकसभा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी (Manoj Soni) यांनी राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. यूपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसने (Congress) मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनोज सोनी हे 2017 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. 16 मे 2023 रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत होता. मात्र मनोज सोनी यांचा कार्यकाल संपण्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संविधानिक संस्था ताब्यात घेण्याचा मोदी सरकारकडून प्रयत्न
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी एक्स या सोशल मिडियावर पोस्ट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील संविधानिक संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न मोदी सरकार आणि आरएसएसकडून होत आहे. म्हणून या संस्थांची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता धोक्यात आली आहे. यूपीएससी परीक्षेतील काही घोटाळे मागील दिवसात समोर आले आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
घोटाळे आणि यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा याचा काही संबंध आहे का?
यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या पाच वर्षांपूर्वीच यूपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय एक महिना गुप्त का ठेवण्यात आला? मागील काही दिवसांत उघडकीस आलेले घोटाळे आणि यूपीएससीच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा याचा काही संबंध आहे का? असा सवाल उपस्थित करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरण्याचे काम
मोदी सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने त्यांची चूक स्वीकार केली पाहिजे. मागील काही दिवसांत खोटी जात आणि वैद्यकीय प्रमाणपत्रं सादर केल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. हा लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात असून विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करून परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरण्याचे काम झाले असल्याची टीका त्यांनी केली आहे.
आणखी वाचा