नांदेड: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारुन नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे सोमवारी पहाटे अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वसंत चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांच्यावर हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र,सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे नांदेडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोकाकुल वातावरण आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
११ तारखेला तब्येत ठीक नसूनही वसंत चव्हाणांनी भाषण केलं: विजय वडेट्टीवार
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने मोठे होते. एक मितभाषी, मृदू बोलणारा आणि काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती होती. ते कधीही कोणाला दुखवायचे नाहीत. 11 तारखेला लातूर आणि नांदेड दौऱ्यावेळी माझी त्यांच्याशी भेट झाली होती. या दौऱ्यात वसंत चव्हाण आमच्याबरोबर फिरत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. त्यावेळी त्यांना त्रास जाणवत होता. पण ते इतक्यात जातील, असे वाटले नव्हते. त्यांनी विपरीत परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला ताकद दिली आणि ते स्वत: लोकसभेत निवडून आले, यावरुन त्यांची जिल्ह्यातील लोकप्रियता कळून येते. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशा भावना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या.
अनुभवी नेता हरपला. आमच्यात राजकीय मतभेद होते, पण व्यक्तिगत संबंध चांगले: अशोक चव्हाण
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभेची जागा हमखास महायुतीला मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत सगळ्यांनाच धक्का दिला होता. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, ही अतिश्य दु:खद घटना आहे. मला पहाटे त्यांच्या निधनाबाबत कळाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरु होते. ते आमचे जुने सहकारी होते, आमदार होते. त्यांचे अनुभवी नेतृत्त्वाचा आम्ही अनुभव घेतला होता. आमच्यात राजकीय मतभेद असतील पण आमचे व्यक्तिगत संबंध चांगले होते, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आम्ही नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी एकमेकांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायचो. त्यांचं जाणं दु:खद आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्ह्यातील राजकारणाची मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
जनतेचं अलोट प्रेम आणि काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला: माणिकराव ठाकरे
वसंत चव्हाण यांच्यावर जनतेचं अलोट प्रेम होते. काँग्रेसचा प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी नांदेड जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळली. या सगळ्यामुळे ते लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांच्या पाठीशी प्रचंड सहानुभूती होते, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झटून त्यांच्यासाठी काम केले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. लोकसभेत विजय झाल्यानंतर आमची तीन-चार वेळा भेट झाली होती. ते आमच्यातून निघून जाणे दुर्दैवी आहे. नांदेड जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, अशा भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
आणखी वाचा
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास