मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून भाजपने निवडणुकांपूर्वीच 44 नगरसेवक जिंकले आहेत. कारण, कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकेत भाजप महायुतीचे जवळपास 68 नगरसेवक बनिविरोध निवडून आले आहेत. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनसेनं न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले (Nana patole) यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना, भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय झाला आहे, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केलं.
नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत, जेष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हणत नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला. तसेच, विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावरुन त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली. विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे. राजकारणी म्हणून त्यांना वावरता येत नाही, त्यामुळे भाजपचे त्यांना बदलावे, असेही नाना पटोले यांनी म्हटले. तर, निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असे म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
सरकार प्रचारात व्यस्त, जनता वाऱ्यावर आहे, म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि नेतेमंडळी हेलिकॉप्टरने फिरत आहे. 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, तरीही मी मोकळा आहे, अजित पवारांचे हे वक्तव्य सूचक आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
निवडणूक आयुक्त भाजप कार्यकर्त्यासारखे वागतात
राज्यातील महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका झाल्याने निवडणूक आयोगाने यु-टर्न घेतला आहे, आधी चौकशी करू असं ते म्हणाले होते. आता, आयोगाने वेगळी भूमिका घेतली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, लोकशाहीसाठी हे घातक आहे.
भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय
शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टँप ड्युटी माफ करण्याच्या निर्णयावरूनही नाना पटोले यांनी टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आहे, ही कर्ज घेण्याची वेळ नाही, आधी घोषणा केली असती तर फायदा झाला असता, महसूलमंत्री मुनगंटीवार यांचे काय सुरू आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. भाजपमध्ये भविष्यात स्फोट होईल, मुख्यमंत्री विरोधात गट सक्रीय झाला आहे. कुणाला जर याचे वाईट परिणाम भोगावे लागत असतील तर ते शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत, असे गौप्यस्फोटही नाना पटोले यांनी केला. दरम्यान, भाजपवाले मानसिक आजारी झाले आहेत, सत्तेचा माज आहे. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा रोष आहे, याचा उद्रेक होईल. लोकांचे मत घेण्यासाठी हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी या विषयांवर राजकारण सुरू आहे. कांग्रेस सर्वधर्मसमभाव असणारा पक्ष आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले.