मुंबई: अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता मराठवाड्यात पक्षाला आणखी एक खिंडार पडणार आहे. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बसवराज पाटील यांनी सोमवारी आपल्या काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते येत्या दोन दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा होणार आहे. आगामी निवडणुकीच्यादृष्टीने हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


कोण आहेत बसवराज पाटील?


बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील उमरग्याच्या मुरूमचे रहिवासी आहेत. राजकीय वर्तुळात बसवराज पाटील हे  माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. ते काँग्रेसचे निष्ठावंत असून औसा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.  2009 आणि 2014 अशा दोन निवडणुकांमध्ये ते औसा येथून विजयी झाले होते. काँग्रेसने त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपद दिले होते. मात्र, २०१९ मध्ये  अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर बसवराज पाटील हे काँग्रेसमध्ये काहीसे साईडलाईन झाल्याची चर्चा होती. त्यामुळे आता बसवराज पाटील यांनी भाजपची वाट धरल्याचे सांगितले जाते.


लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा, जोरदार प्रचार


बसवराज पाटील यांना गेल्या बऱ्याच काळापासून लोकसभा निवडणूक लढवण्याचे वेध लागले आहेत. यासाठी त्यांनी फार पूर्वीपासूनच प्रचारही सुरु केला आहे. बसवराज पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या जागावाटपात धाराशिवची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला मिळू शकते. बसवराज पाटील यांना पक्षात आणून त्यांना धाराशिवमधून उमेदवारी द्यायची असल्यास भाजपला इतर एखाद्या जागेच्या बदल्यात ही जागा पदरात पाडून घ्यावी लागेल. परंतु, भाजपमध्येच या जागेसाठी अनेकजण इच्छूक आहेत. यामध्ये राणा जगजितसिंह पाटील आणि बसवराज मंगरुळे यांचा समावेश आहे. 


अशावेळी पर्याय म्हणून बसवराज पाटील यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारीही ठेवली आहे. औसा मतदरासंघात लिंगायत समाज मोठ्याप्रमाणावर असल्याने बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे. परंतु, फडणवीसांचे विश्वासू असलेल्या अभिमन्यू पवार यांना डावलून बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळणे, अवघड मानले जात आहे.


आणखी वाचा


ती एक गोष्ट घडल्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेस सोडतील, याचा अंदाज आला होता: शरद पवार