Harshvardhan Sapkal denied alliance with MNS: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला (MNS) मविआसोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट नकार दिला आहे.  काँग्रेस आणि महाविकास आघाडीला (MVA Alliance) नव्या भिडूची गरज नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले. 'एबीपी माझा'शी बोलताना सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआचं काय होणार, याची चर्चा आता रंगली आहे.

Continues below advertisement

Harshvardhan Sapkal on MNS: हर्षवर्धन सपकाळ मनसेबाबत नेमकं काय म्हणाले?

इंडिया आघाडीसोबत आमच्या वाटाघाटी या स्थानिक पातळीवर होणार आहेत. त्यामुळे जिल्हा, ब्लॉक आणि नगरपालिका पातळीवर आमचं स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल. त्यांच्या निर्णयावर आम्ही या सर्व गोष्टी सोडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते.  

MNS on Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया

हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महायुतीत घेण्यास नकारघंटा वाजवल्यानंतर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. मुळात मनसेला महाविकास आघाडीत घ्या, अशी परवानगी मागायला काँग्रेस पक्षाकडे कोण गेले होते? आमच्याकडूनही त्यांच्याकडे कोणीही गेले नव्हते. हर्षवर्धन सपकाळ नेमके कशासंदर्भात बोलले आहेत, हे मला माहिती नाही. पण आमच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे हेच घेतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी या कौटुंबिक स्वरुपाच्या आहेत. त्यांच्यात राजकीय स्वरुपाच्या कोणत्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत. किमान आम्हाला तरी तशी कोणतीही माहिती नाही.  उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीबाबत केलेल्या वक्तव्यांचा आम्हाला आदर आहे. पण राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल, असे अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले.

Continues below advertisement

Thackeray camp on Harshvardhan Sapkal: हर्षवधन सपकाळांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा, ठाकरे गटाच्या सचिन अहिरांचं स्पष्टीकरण

काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र विचारधारेचा आहे. तो पक्ष महाविकास आघाडीचा भाग असला तरी त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं बारकाईने ऐकलं तर लक्षात येईल की, त्यांनी युतीच्या निर्णयाबाबत स्थानिक स्तरावर चर्चा होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे कदाचित ठाण्यात आणि पुण्यात त्यांची भूमिका वेगळी असू शकते. स्थानिक स्तरावर युती झाली नाही याचा अर्थ ते मविआतून बाहेर पडणार असा होत नाही. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते बसून याबाबत निर्णय घेतील.  मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिकमध्ये मराठी मतांचं विभाजन होऊ नये, ही ठाकरे गटाची भूमिका आहे. मात्र, काँग्रेस पुणे आणि ठाण्यात स्वबळावर लढणार का, याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले.

आणखी वाचा

जिथे मनसेने परप्रांतीयांच्या कानाखाली जाळ काढला, तिकडेच शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांकडून हिंदी भाषिकांसाठी पायघड्या, आयुक्तांना म्हणाले....

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वादग्रस्त वक्तव्य बुमरँग, शिंदे गटातील सगळ्यांनी हात वर केले, आता रामदास कदमांची सारवासारव