कोल्हापूर: राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची धामधुम सुरु असताना कोल्हापूरमध्ये शनिवारी राजकीय हालचालींनी वेग पकडल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापूरमध्ये आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi in Kolhapur) यांची सभा होणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील कोल्हापूरमध्ये उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सकाळीच कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी येथील एका हॉटेलमध्ये बसून राजकीय सुत्रं हलवायला सुरुवात केली आहे.
एकनाथ शिंदे हे कोल्हापूर येथील हॉटेल पंचशीलमध्ये मुक्कामाला आहेत. याठिकाणी उपस्थित असणाऱ्या काहीजणांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार तासांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हॉटेलमधील आपल्या खोलीतच बसून आहेत. कोल्हापूरमध्ये दाखल होऊनही त्यांनी अद्याप येथील महायुतीचे उमेदवार, प्रमुख व्यक्ती किंवा अन्य कोणाचीही भेट घेतलेली नाही. गेल्या चार तासांपासून ते खोलीत बसून फक्त फोनवरच बोलत आहेत. येत्या 24 तासांमध्ये महायुतीचे अंतिम जागावाटप (Mahayuti Seat Sharing) जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई आणि पालघरची जागा कोणाच्या वाट्याला येणार, यावर शिक्कामोर्तब होईल. त्यादृष्टीने एकनाथ शिंदे हे हॉटेलच्या खोलीत बसून फोनाफोनी करत असल्याची माहिती आहे. गेल्या चार तासांमध्ये एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन अनेक नेत्यांसोबत बातचीत केल्याची माहिती आहे. तिकीटवाटपाचा घोळ संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून ही फोनाफोनी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता येत्या काही तासांमध्ये महायुतीमधील जागावाटपाचा घोळ संपणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाण्यातून प्रताप सरनाईकांना उमेदवारी?
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे आणि नाशिक लोकसभेची जागा शिंदे गटालाच मिळू शकते. तर दक्षिण मुंबई आणि पालघरची जागा भाजपच्या वाट्याला जाईल. ठाण्यातून शिंदे गटातर्फे आमदार प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळू शकते. त्यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. तर दक्षिण मुंबईतून भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांमध्ये या सगळ्या जागांवरील महायुतीचे उमेदवार जाहीर होऊ शकतात.
आणखी वाचा
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे संपलेले असतील, नाना पटोलेंचा हल्लाबोल