मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचं वारंवार दिसून येतं. यापूर्वी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य केल्यामुळे, तसेच नागपूर येथील हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना (Nitesh Rane) समज दिली होती. त्यानंतर, आता महायुतीत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य नितेश राणेंनी केल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितेश राणेंना खडसावलं आहे. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना, नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, त्यांच्यावर शिवसेना (Shivsena) नेते व महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही टीका झाली. तर, मंत्रिमंडळ बैठकीतही आज तो विषय निघाला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राणेंना समज दिली.
नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. तसेच, कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणेंनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना दिली. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणूनच, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं नितेश राणेंनी म्हटलं होतं.