नागपूर: विधिमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखातं काढून घेतले जाणार आहे. त्यानंतर कृषी खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाईल? अशा चर्चां होत असतानाच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावरून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा कृषीखातं मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भेटीबाबतचा खुलासा देखील त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता, त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे, आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे. त्यांना दुसरं खातं दिला आहे आणि कृषी खातं हे दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे देण्यात आले, दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आपण जनतेची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत आणि जनतेची सेवा करताना आपण काय बोलतो, काय करतो, कसे बोलतो, या सर्व गोष्टी दिसतात आणि त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असंही पुढे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
मुंडे अन् फडणवीसांच्या भेटीवर म्हणाले...
तुमची माहिती अर्धवट आहे त्यांनी (धनंजय मुंडेंनी) तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा ही मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो, असंही पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कोकाटेंकडचं कृषीमंत्रीपद आता भरणेंकडे..
विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी केली असून माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं होतं, त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेल्या क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत.