NCP Suraj Chavan beaten Chhava Sanghatana Workers: 'राज्यातील जनतेला वाटतंय की, आमदार माजले आहेत. लोक आपल्या शिव्या घालत आहेत', अशा भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समज दिल्यानंतरही सत्ताधारी गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीत तसूभरही फरक पडला नसल्याचे रविवारी लातूरमध्ये (Latur News) दिसून आले. काल लातूरमध्ये अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले होते. यानंतर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या (Chhaava organisation) विजयकुमार पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. सूरज चव्हाण यांनी जातीने या सगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांनी अगदी कोपर आणि बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. यानंतर छावाच्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी विजयकुमार पाटील यांच्याशी 'एबीपी माझा'ने संवाद साधला. तेव्हा त्यांनी सूरज चव्हाण यांनी आपल्याला कशाप्रकारे मारहाण केली, याचा वृत्तांत कथन केला.
मला छातीत दुखायला लागलं आहे. त्यांनी माझ्या छातीत आणि पाठीत बेदम मारहाण केली. माझ्या डाव्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली आहे. मला समोरची व्यक्ती डबल दिसत आहे. उद्या डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये काय येतंय बघू, असे विजयकुमार पाटील यांनी सांगितले. विजयकुमार पाटील हे एका खोलीत सोफ्यावर बसले होते. त्यावेळी सूरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्यावर तुटून पडले होते. त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना यथेच्छ मारहाण केली होती. यावरुन छावा संघटना प्रचंड आक्रमक झाली असून सोमवारी लातूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
आमचे पदाधिकारी विजयकुमार पाटील हे निवेदन देण्यासाठी सुनील तटकरेंकडे गेले होते. ते निवेदन देऊन एका रुममध्ये बसले होते. त्यावेळी सूरज चव्हाण याच्यासह आलेल्या लोकांनी त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला चढवला. छावा ही शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे. आमचे पदाधिकारी सुनील तटकरे यांच्याकडे शेतकऱ्यांचा विषय घेऊन गेले होते. विधानभवनात गेम खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेल्या आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होतात. या हरामखोर लोकांवर कारवाई झाली पाहिजे. छावाचा इतिहास आहे, आमच्या पद्धतीने धडा शिकवू, सूरज चव्हाणला माफी नाही. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर ठरवून हल्ला झाला. अजित पवार यांनी याप्रकरणात लक्ष घातले पाहिजे. सूरज चव्हाण याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी छावाचे केंद्रीय अध्यक्ष जावळे यांनी केली.
आणखी वाचा