Chhatrapati Sambhajinagar Election 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद वाढली आहे, आपण काहीही करु शकतो, हा अहंकार भाजपच्या मनात निर्माण झाला आहे. याच अहंकारापोटी भाजपने संभाजीनगर महानगरपालिकेत (Chhatrapati Sambhajinagar Election 2026) शिवसेनेशी असलेली युती तोडली, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजपने (BJP) एकत्र लढले पाहिजे, हा आमचा आग्रह होता. शिवसेना-भाजपने  एकत्र लढावे, असे लोकांनाही वाटते. त्यामुळे ही युती तुटली या गोष्टीचे आम्हाला वाईट वाटते. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी हेतूपूर्वक युती तोडली, असा आरोपही संजय शिरसाट यांनी केला.

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिढा असलेल्या जागांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले होते. त्यानंतर जागावाटपाचा तिढा सुटला होता. तरीही सकाळी पुन्हा त्याच जागेवर तिढा निर्माण करण्यात आला. भाजपच्या नेत्यांना जाणुनबुजून युती तोडायचीच होती. आम्हाला खेळवलं गेलं, भाजपला आम्हाला अंधारात ठेवून त्यांचा हेतू साध्य करायचा होता. भाजपने एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरु ठेवली आणि दुसरीकडे आपल्या उमेदवाराला सांगून ठेवले होते. आम्हाला गाफील ठेवून ऐनवेळी आमची धावपळ होईल, असा पद्धतीचा भाजपचा प्रयत्न होता. एखाद्याला शब्द दिल्यावर आम्ही पाळतो. पण भाजपकडून तसे करण्यात आले नाही. आता आम्ही शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरण्यास सांगितले आहे. तिथेही भाजपकडून अडचण आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मिळून युती तोडली. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र त्यांनी युती तोडली. युतीमध्ये लढा असे आम्ही वारंवार सांगत होतो. मतदारांच्या मतांचा अनादर कराल तर महागात पडेल. या लढाईत आता प्रतिस्पर्धी जसा वार करेल, तसंच त्याला उत्तर दिलं जाईल. एकमेकांवर चिखलफेक होऊ नये, ही आमची भूमिका असेल. परंतु, जर आमच्यावर कुणी चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील संजय शिरसाट यांनी यावेळी दिला.

Continues below advertisement

आणखी वाचा

 मोठी बातमी : भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय, संजय शिरसाट यांची घोषणा, संभाजीनगरात शिंदेसेना-भाजपमध्ये स्फोट