Chhagan Bhujbal & Ajit Pawar : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. मात्र, अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलून 2009 चा बदला घेतला का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. 2009 च्या विधानसभेनंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, मात्र तेव्हा भुजबळांनी मोठी ताकद लावली आणि उपमुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं. तेव्हापासून अजित पवार आणि छगन भुजबळ हा संघर्ष सुरू झाला. याचे संघर्षाचे पडसाद यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात उमटले आणि अजित पवारांनी भुजबळांना डावलून 2009 चा बदला घेतला. अशी चर्चा सुरु आहे. पण 2009 साली नेमकं काय घडलं होतं, याबाबत त्यावेळी निर्माण झालेल्या संघर्षाचे साक्षीदार माजी आमदार विलास लांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
विलास लांडे म्हणाले की, 2009 साली अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनी तो निर्णय घेतला होता. शरद पवारांनी निर्णय घेतल्यानंतर छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यावेळी काही संघर्ष नव्हता. शरद पवारांच्या निर्णयामुळे अजित पवार नाराज झाले होते. तुम्ही मला का संधी देत नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण पक्ष श्रेष्ठींनी त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर छगन भुजबळ यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी ठरवले की भुजबळ यांच्यापेक्षा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावे. आम्ही आमच्या पक्षातील सर्व आमदारांना एकत्र केले. या घटनेचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी जयंत पाटील, आर. आर. पाटील, छगन भुजबळ आणि मोहित पाटील इच्छुक होते. आम्ही सह्यांची मोहीम सुरु केली. काही आमदारांनी सह्या दिल्या तर काहींनी सह्या नव्हत्या दिल्या. परंतु 90 टक्के आमदार हे अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.
एका माणसाला किती पदं द्यायची?
छगन भुजबळ यांना हटवून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले का? असे विचारले असता ते म्हणाले की, सर्व आमदारांनी सांगितले होते की, भुजबळ साहेबांनी आता थांबायला हवे आणि अजित पवारांना संधी देण्यात यावी, असे विलास लांडे यांनी म्हटले. तर भुजबळ-अजितदादा संघर्षाचे पडसाद यंदाच्या मंत्रिमंडळात दिसून आले का? अजित पवारांनी छगन भुजबळांना एकही पद दिले नाही, असे विचारले असता एका माणसाला किती पदं द्यायची. त्यांच्या मुलाला विधान परिषद, त्यांचा पुतण्या माजी खासदार, ते स्वतः मंत्री झालेत. त्यांनी कुठला ओबीसी कार्यकर्ता मोठा केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भुजबळ साहेबांनी आता अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहावे आणि पक्ष मोठा करावा, असेही विलास लांडे यांनी म्हटले.
आणखी वाचा