Chhagan Bhujbal Covid Positive: महाराष्ट्रात एकीकडे राजकीय गदारोळ सुरू असताना महाविकास आघाडतील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती काही वेळेपूर्वीच दिली होती. त्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हेही कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. भुजबळ यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती देताना भुजबळ यांनी ट्वीट केलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल, असं ते म्हणाले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असं सांगितलं आहे. तसेच सर्वांनी कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले आहे.
तत्पूर्वी अजित पवार यांनी आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्वीट केली होती. ते ट्वीट करून म्हणाले होते की, ''काल मी कोरोनाची चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.''