Padalkar Writes Letter To Fadnavis : "महाज्योती संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदला," अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichad Padalkar) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. महाज्योतीच्या (MahaJyoti) संचालकांकडून आणि प्रशासकीय यंत्रणेकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटेच पुढे रेटली जात आहेत. यामुळे माध्यमांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथे पूर्ण वेळ आणि बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या अधिकाऱ्याला संधी द्यावी, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. 


उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात गोपीचंद पडळकर म्हणतात की, "आपण मुख्यमंत्री असताना बहुजन, गोरगरीब विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढावा, त्यांचा कौशल्य विकास व्हावा, बहुजन समाजातील विविध समस्यांचा धोरणात्मक अभ्यास व्हावा, या हेतून आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने महाज्योती या संस्थेची स्थापना केली. परंतु  महाविकास आघाडी सरकारने महाज्योतीसारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थांना स्वत:च्या फायद्याच्या यंत्रणा म्हणून पाहिलं. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: ढासळली होती. आपलं सरकार सत्तेत आल्यानंतर तातडीने खात्याचे मंत्री मा. अतुलजी सावे यांनी महाज्योती संस्थेचे अनेक रखडलेले निर्णय एका दिवासात मार्गी लावले आहेत."


शिंदे-फडणवीस सरकारच्या प्रतिमेला तडा जातोय
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्थापित झालेल्या अनेक चुकीच्या प्रशासकीय प्रथा आजही कार्यरत आहेत, असा आरोपी गोपीचंद पडळकर यांनी केला. तसंच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे प्रशिक्षण कोणत्या संस्थेकडून घ्यायचे याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. परंतु कोणतेही स्पर्धात्मक खुले कंत्राट न मागवता. आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटेच महाज्योतीच्या संचालकांकडून आणि प्रशासकीय यंत्रणेकडून पुढे रेटले जात आहे. यामुळे वारंवार माध्यमांमध्ये शिंदे-फडणवीस सरकाच्या प्रतिमेला तडा जात आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


'बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या अधिकाऱ्याला संधी द्या'
आपण महाज्योती संस्थेची स्थापना एका उद्दात्त हेतूने केली आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी संस्थेतील व्यवस्थापकीय संचालक बदलून तिथे पूर्णवेळ आणि बहुजन विद्यार्थ्यांचे प्रश्न संवदेनशीलतेने हाताळण्याऱ्या अधिकाऱ्याला संधी द्यावी. त्यामुळे आपल्या पारदर्शकतेच्या प्रतिमेला आणखी झळाळी मिळेल आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 




2019 मध्ये महाज्योतीची स्थापना
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता 'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था' (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली होती.


संबंधित बातमी


Maharashtra Politics : महाज्योतीतून तायवाडे, गमे, वडलेंची सुट्टी; सरकारकडून नियुक्त्या रद्द