Chandrashekhar Bawankule : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला. ‘फुले’ चित्रपटास त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रात ‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे! मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावे. नाहीतर हा झगडा ‘फुले विरुद्ध फडणवीस’ असाच आहे यावर शिक्का बसेल अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. आता यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा दावा केलाय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कधी काळी उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, या गोष्टीवर विश्वास बसू नये, असाच त्यांचा सध्याचा वावर आहे. ‘सामना‘ तील अलीकडच्या काही दिवसांतील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्टया संपविण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत, अशी शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जात आहे. अकलेचा कांदा... म्हणजे कोण तर याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. हो तेच बिनबुडाचे चंबू! रोज सकाळी उठून आपणच किती ग्रेट, थोर, विचारवंत आहोत असे भासवण्याचा ज्यांना ऊत येतो तेच! ते कोण आहेत? हे महाराष्ट्राला ठाऊक आहे.
भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न
आजही त्यांनी भांडण लावण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्रात केला. त्यांची कीव आली. सत्ता गेली की व्यक्ती किती अगतिक होतो, बरळू लागतो, आजूबाजूचे पिवळे दिसू लागते. महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील चित्रपटावरून त्यांना मानसिक ऊत आला, त्यांनी गरळ ओकली. लोकनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. अर्थात, ज्यांनी आरोप केले त्यांना खरंतर बुडंच नाही. काय तर म्हणे, फुले विरुद्ध फडणवीस!! अरे महाभागा, तुमची बुद्धी गचाळ होत चालली.
नव्या महाभारतात झोपेचे सोंग घेतलेला संजय बिनकामाचा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न‘ द्यावे अशी शिफारस विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारला केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही आणि आता त्यांचे बगलबच्चे फुले विरुद्ध फडणवीस असा नवा शोध लावून बोंबलत सुटले. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत खोटारड्यांवर आसूड ओढला. तरी अक्कल ठिकाणावर आली नाही. उद्धव ठाकरे यांना कळतच नाही की, नव्या महाभारतात झोपेचे सोंग घेतलेला संजय बिनकामाचा आहे. सर्व संपल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण तेव्हा ते काहीच करू शकणार नाहीत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
आणखी वाचा