Maharashtra Assembly Election Results 2024 : नागपूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे हिंगणा येथील आमदार समीर मेघे (Sameer Meghe) आणि काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर (Charansingh Thakur) यांना नोटीस धाडण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीला दिलेल्या आव्हान प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही नोटिस बजावली आहे. परिणामी, या दोन्ही आमदारांना तीन आठवड्यात आपला जबाब नोंदवण्याचे निर्देशही नागपूर खंडपीठाने दिले आहे.
तीन आठवड्यात जबाब नोंदवण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
पुढे आलेल्या माहितीनुसार, हिंगणा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पराभूत उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. तर काटोल मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांनी याचिका दाखल केली. विधानसभा निवडणुकीत विद्यामान आमदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांची निवड अवैध ठरण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. सोबतच या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी ही या याचिकेतून करण्यात आली आहे. दरम्यान याच प्रकरणी आता आमदार समीर मेघे आणि आमदार चरणसिंग ठाकूर यांना नोटीस धाडण्यात आली आहे. या नोटिसवर हे दोन्ही आमदार नेमकं काय उत्तर सादर करतात, आणि या याचिकेतून पुढे काय होतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशी रंगली होती विधानसभा निवडणुक
नागपुरातील 12 मतदारसंघातील 'हायप्रोफाइल' लढतीत काटोल विधानसभा मतदारसंघातही काटेकी टक्कर झाल्याचे बघायला मिळाले. कारण या मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्याविरोधात भाजपचे चरणसिंग ठाकूर उभे होते. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यामुळे येथील राजकारण तापले होते. मात्र मतदारांनी ठाकूर यांच्यावर विश्वास टाकला व त्यांचा 38 हजार816 मताधिक्याने विजय झाला आहे.
अशातच राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघापैकी एक असलेल्या नागपूरच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठा विजय मिळवला. या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा महायुतीकडून भाजपच्या तिकिटावर समीर मेघे (Sameer Meghe) हे मैदानात उतरले. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माजी मंत्री रमेश बंग (Ramesh Bang) मैदानात होते. या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीत बरेच उमेदवार मैदानात असले तरी खरी लढत मेघे विरुद्ध बंग यांच्यातच होती. मात्र या दोन दिग्गजांच्या लढतीत भाजपने विजयाचा गुलाल उधळत सलग तिसऱ्यांदा समीर मेघे यांनी मोठे यश संपादन केलं आहे.
हे ही वाचा