मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबविलेला 'लिफाफा' पॅटर्न राबविला जात आहे. वेगवेगळ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) कुणाला उमेदवारी द्यावी, याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने (BJP) मंगळवारी संभाजीनगरमधील पक्षातील जिल्हाभरातील प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात उमेदवारांची नावे मागवून घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य क्रमानुसार तीन उमेदवारांची नावे बंद पाकिटातून सोपविली.


उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची ही पहिली परीक्षा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गोवा आणि बिहारच्या निवडणुकीत देखील भाजपकडून लिफाफा पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यामुळे आता भाजपचा हा पॅटर्न महाराष्ट्रात कितपत प्रभावी ठरणार, हे बघावे लागेल. आगामी निवडणुकीत भाजपकडून अनेक जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यमान आमदारांना डच्चू दिला जाईल. तसे घडल्यास भाजप पक्षसंघटनेत याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल.


सह्याद्री अतिथीगृहावर भाजपची महत्त्वाची बैठक


विधानसभा निवडणुकीत भाजपने 150 ते 160 जागांवर लढण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांची महायुती आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. महायुतीचा राज्यातील नेत्यांची वादातीत जागांवर चर्चा पार पडल्यानंतर आजच्या बैठकीत अमित शाह यांच्याकडे या जागांची माहिती देण्यात येणार आहे. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते गणेश नाईक यांनी अमित शाह यांची भेट घेतली.


अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आतापर्यंतच्या दौऱ्यात अमित शाह यांनी भाजपच्या छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, रायगड, ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे. यावेळी अमित शाहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही सल्ले दिले होते. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक बुथवरील 10 टक्के मतदान वाढवा. वेळ पडल्यास साम-दाम-दंड-भेद रणनीती वापरा आणि बुथवरील इतर पक्षांचे कार्यकर्ते फोडा, असा सल्ला अमित शाह यांनी भाजपच्या नेत्यांना दिला होता. 


राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक


विधानसभा निवडणुकीची  आचारसंहिता लागण्याच्या आधी महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. यावेळी एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या दोन बैठका होणार आहेत. गेल्या  मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चाळीसहून अधिक निर्णय घेतले होते.  याही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठ्याप्रमाणावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 



आणखी वाचा


भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण