मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजपने 32 जागांवर लढण्याची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोंडीत पकडले आहे. अशातच आता भाजपने शिंदे गटाचे टेन्शन वाढवणारी आणखी एक कृती केली आहे. भाजपकडून शिंदे गटाला (Shinde Camp) त्यांच्या वाट्याला येणाऱ्या लोकसभेच्या 5 जागांवरील उमेदवार बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपच्या (BJP) अंतर्गत सर्वेक्षणात शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या पाच जागांवर यंदा त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही सुचविलेले उमेदवार या जागांवर उभे करा, असा अप्रत्यक्ष आदेशच भाजपश्रेष्ठींनी शिंदे गटाला दिला आहे. भाजपच्या या कृतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाखुश आहेत. भाजपने सुचविलेले उमेदवार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मान्य नसल्याची माहिती आहे. या पाचही जागांवर आमच्याच पक्षाचे उमेदवार उभे राहतील, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


महायुतीच्या जागावाटपासाठी सोमवारी अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी शिंदे गटाच्या 5 जागांवरील उमेदवार बदलण्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या 5 जागांमध्ये ठाणे, नाशिक, कोल्हापूर, हातकणंगले आणि बुलढाण्याच्या जागेचा समावेश आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडे कोणता बडा नेता नाही. त्यामुळे रविंद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांची नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. परंतु, या दोन्ही नेत्यांना उभे केल्यास ठाण्यात महायुतीला विजय मिळणार नाही. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी रविंद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांना निवडून आणणे अवघड आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपने धरला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा-भाईंदरपासून ते नवी मुंबईपर्यंतचा परिसर येतो. नवी मुंबईत गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे संजीव नाईकांना उमेदवारी दिल्यास नवी मुंबईतून भाजप आणि ठाण्यातून एकनाथ शिंदे गटाची ताकद एकत्र येईल, असे भाजपचे म्हणणे आहे.


तर नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी शिंदे गटाने हिंदुत्त्ववादी चेहरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवावा, असे भाजपचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिक हे हिंदुत्त्वाचे राजकीय केंद्र म्हणून उदयाला आले आहे. त्यामुळे येथून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी दिल्यास ते निवडून येतील, असे भाजपचे म्हणणे आहे. कोल्हापूर मतदारसंघातून शिंदे गटाने समरजीत घाटगे किंवा धनंजय महाडिक यांना उमेदवारी द्यावी. याठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपशी जवळीक असलेल्या जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांना शिंदे गटाने उमेदवारी द्यावी, असे भाजपचे म्हणणे आहे. यावर आता अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.


आणखी वाचा


भाजपकडून शिंदे गट आणि अजितदादा गटाला सिंगल डिजिट जागा? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...