Maharashtra Political Updates : मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेवर (Shiv Sena) जाहीर झालेल्या आठपैकी दोन उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावलीय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शिवसेनेनं घोषित केलेल्या आठपैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशी शक्यता आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कालच व्यक्त केली आहे. एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल, तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात, शक्यता नाकारता येत नाही, असं शिरसाट म्हणाले. त्यामुळे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि हातकणंगलेचे (Hatkanangale) उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या जागी दुसरा उमेदवार देण्यासाठी भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदेंवर दबाव आहे का? असं प्रश्न विचारला जात आहे.


उमेदवारी मागे घेण्यामागचं कारणं काय? दरम्यान हिंगोलीत उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिवसेनेचाच. निवडून येईल असा उमेदवार सूचविण्याचं काम आपण करु शकतो. प्रत्येकानं महायुतीचा धर्म पाळा, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे.


जाहीर झालेल्या आठपैकी दोन उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुष्की?


शिवसेनेनं घोषित केलेल्या आठपैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो अशी शक्यता आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलीय. एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात, शक्यता नाकारता येत नाही असं शिरसाट म्हणाले. हिंगोली किंवा हातकणंगले किंवा या दोन्ही जागांवर हे होऊ शकतं असं शिरसाट म्हणाले. सध्या हिंगोली, यवतमाळ वाशिम, हातकणंगले या मतदारसंघात उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


महायुतीत धुसफूस, शिवसेना नाराज? 


सध्या राज्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांच्या महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. आगामी लोकसभेसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र लढणार आहेत. अद्याप महायुतीचा लोकसभेसाठीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच या जागावाटपामुळे शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजपकडून ज्या भागांत शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, अशा मतदारसंघांवर दावा सांगितला जात असल्याचं दिसत आहे. यावरुन शिंदेंच्या शिवसेनेत कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपकडून वारंवार सर्व्हेचं कारण देऊन शिवसेनेचं प्रभुत्व असलेल्या मतदारसंघावर दावा सांगितला जात असल्याचं शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी जाहीरपणे सांगितलं आहे. तसेच, मनसेला महायुतीत सामील केल्या मनसेला शिंदेंच्याच वाट्याचा मतदारसंघ दिला जाणार असल्याचं बोललं जात होतं. यासर्व कारणांमुळे सध्या महायुतीत धुसफूस सुरू असून शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.