Mira Bhayandar morcha against MNS: मिरारोड परिसरात एका अमराठी दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मीरा-भाईंदरमध्ये (Mira bhayandar news) काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. यावेळी मराठीच्या मुद्द्यावरुन दुकानदाराला कानशिलात लगावणाऱ्या मनसेच्या (MNS) कृतीचा निषेध करण्यात आला होता. यावरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण तापल्यानंतर मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. मारहाण झालेला संबंधित दुकानदाराने हा वाद मिटवण्याची तयारी दाखवली होती. मात्र, भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला लावला, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला होता. या सगळ्या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसेत प्रवेश केला. मनसेच्या अधिकृत सोशल मिडिया हँडवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.
आज मीरा-भायंदर येथे झालेल्या भाजप पुरस्कृत मोर्च्यावर नाराजी व्यक्त करत, तसेच स्थानिक भाजप आमदारांवर तीव्र रोष व्यक्त करत पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला, असे मनसेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
मिरारोड येथील सेवेन स्कूल ते पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत गुरुवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत (Traders) जे घडले, ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकते, अशी चिंता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे केली.
MNS Avinash Jadhav: भाजपच्या नेत्यांनी असंतोष पसरवल्याचा मनसेचा आरोप
मीरारोड परिसरातजिथे बंद पाळण्यात आला तो एक लहानसा परिसर आहे. तेथील 25 ते 50 व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला होता. खरंतर आजचं आंदोलन होतं, ते व्यापाऱ्यांचं नाही तर भाजपच्या लोकांचे होते. भाजपमधील येथील नेते, पदाधिकारी, वकील आणि नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातील काही लोक आहेत, त्यांनी हे आंदोलन केले. हे भाजपने मराठी माणसाविरोधात केलेलं आंदोलन आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला होता.
भाजप नेत्यांनी दुकानदाराला मारहाण करतानाचा फक्त 40 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल केला. व्हीडिओतील तेवढाच भाग कट करुन व्हायरल करण्यात आला. त्याच्या मागे-पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी फक्त तेवढाच भाग सोशल मीडियावर शेअर केल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले.
आणखी वाचा