मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतल्यानंतर आता पुढील 5 वर्षे देवाभाऊच मुख्यमंत्रीपदी असणार आहेत. कारण, राज्यात महायुतीला व भाजपला भरगोस यश मिळालं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. दुसरीकडे अजित पवार हे भविष्यात कधी ना कधी मुख्यमंत्री होईल, असे सांगतात. तर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठलाच्या आशीर्वादाने अजित दादा मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची (Chief minister) चर्चा होत आहे. त्यातच, भाजप नेते व मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले. देवाभाऊ हेच पुढील 100 वर्षे मुख्यमंत्री व्हावे, अशी प्रार्थना करण्याचे त्यांनी मच्छिमार बांधवांना सूचवले. 

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे आज वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत. वर्सोवा येथील कोळी बांधवांसोबत त्यांनी मार्केटलाही भेट दिली. यावेळी, बोलताना मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. आपण मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, कारण देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे, देवाभाऊ पुढचे 100 वर्षे मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना करा, असा सल्लाच नितेश राणेंनी येथील कोळी बांधवांना दिला आहे.  

मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा मिळावा ही मागणी वर्षानुवर्ष आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले आणि पहिल्या 100 दिवसात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. आपण आधी सरकार म्हणून मदत मागायला जायचो तेव्हा अधिकारी हात आकडते घ्यायचे, तुटपुंजी मदत द्यायचे. पण, डहाणूमध्ये 1 कोटी 89 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यावेळी मी मदत पुनर्वसन मंत्र्यांकडे गेलो आणि नुकसान जास्तीत जास्त भरून देण्याचे ठरविले. जर आधीच्या अनुषंगाने मदत केली तर मच्छिमारांचा अपमान आहे. मी मुख्यमंत्र्यांना संगितले त्यांनी आदेश दिले आणि आता 100% नुकसान भरपाई देण्याचे ठरविले, असा मदतीचा किस्साच नितेश राणेंनी सांगितला.   

मी गुजरातवरुन थेट तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आता कोणीतीही चिंता करू नका जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊ, असे म्हणत मध्ये मध्ये बोलणाऱ्यांना नितेश राणेंनी यावेळी झापले. मी ऐकणारा मंत्री नाही, ऐक आधी माझे मध्ये-मध्ये बोलायचं नाही असे राणेंनी म्हटलं. 

पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा

आम्ही ड्रोनने पाहणी करत आहोत, जेणेकरून LED वाल्यांच्या ढुंगणाला आग लागेल. जर कोणताही अधिकारी कोणाकडूनही वजन घेत असेल तर त्याला असा जिल्हा देईल की पुन्हा मासे दिसणार नाहीत. मी पूर्णपणे कार्यक्रम करणार आहे, आम्ही कोणाला ही सोडणार नाही, अशा शब्दात राणेंनी अधिकाऱ्यांना इशाराही दिला आहे. 

पहिली आइस फॅक्टरी उभारुया

आपण मच्छी मार्केट बनवत आहोत, तिथे कोळी भवनही असेल तसा प्लान तयार होत आहे. 489 करोड रुपयांची माझ्या खात्याकडून पूर्णपणे तरतूद आहे. इथे पर्यटन कसे वाढेल, तरुणाईला रोजगार कसा मिळेल असा प्लॅन आहे. प्लॅस्टिक मुक्त कोळीवाडे ही मोहीम सुरू करायची आहे. गाळ आम्ही काढू पण प्लास्टिक मुक्त कोळीवाडे करा, मी सगळ्या निवेदनाला न्याय देण्याचे काम करेल. आइस फॅक्टरी पाहिली ती तयार करण्याची आमची तयारी आहे, तुमचा प्रस्ताव पाठवा कार्यक्रम करू. ज्यावेळी आइस फॅक्टरी होईल तेव्हा पूर्ण कोळी वेषात नाचत गाजत येईल, असा शब्दही नितेश राणेंनी दिला. 

हेही वाचा

शरद पवार गटाच्या नेत्याकडून पेपरात अजितदादांच्या 'घड्याळा'ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली