मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमीच वेगवेगळ्य कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या राजकीय विधानाची नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा होते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या काळात तर त्यांच्या टीकेला चांगलीच धार आली आहे. ते पत्रकार परिषदा, सभा, रॅलींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सत्ताधारी भाजप यांच्यावर सडकून टीका करत आहेत. त्यांनी आज (1 एप्रिल) पत्रकारांशी संवाद साधताना पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी (Johnny Lever) केली आहे. राऊतांच्या या टीकेवर भाजपने (BJP) आता आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपचे नेते तथा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय.
प्रसाद लाड काय म्हणाले?
नरेंद्र मोदी हे देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातंय. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातोय, असे प्रसाद लाड म्हणाले. तसेच संजय राऊत यांना उद्देशून 'अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,' असं प्रसाद लाड म्हणालेत. तसंच संजयजी तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केलं, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला संगतो तुला मी सोडणार नाही, असा इशाराही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिला.
संजय राऊत काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर होते. याच दौऱ्याविषयी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी भ्रष्टाचार करू देणार नाही, असं नरेंद्र मोदी आपल्या सभांमध्ये म्हणत आहेत. पण त्याच सभेत मोदींच्या आजूबाजूला भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. रोज सरासरी पाच भ्रष्ट नेते भाजपत प्रवेश करतात, असं राऊत म्हणाले. तसेच मोदी आज एका रॅलीत म्हणत होते की मी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. मोदींचा हा सर्वांत मोठा विनोद आहे. जॉनी लिव्हर यांच्यानंतर जर कोणी सर्वांत मोठा विनोद करत असेल तर ते गुजरातचे लिव्हर आहेत, असे राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या
जॉनी लिव्हरनंतर गुजरातचा लिव्हर आमचं मनोरंजन करतोय, संजय राऊतांची मोदींवर थेट टीका!