मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'अब की बार 400 पार’चा नारा दिला होता. मात्र, या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि मित्रपक्षांसमोर आव्हान निर्माण झाले. या घोषणेमुळे एकप्रकारे एनडीए आघाडीचे नुकसान झाले. एनडीए 400 पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही, ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकीनऊ आले, असे वक्तव्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मंगळवारी याबाबत ट्विट करुन छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी, छगन भुजबळांना आवरण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 


निलेश राणेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?


श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे.  मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही.  आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.




छगन भुजबळ भाजपच्या '400 पार'च्या दाव्याबाबत  नेमकं काय म्हणाले होते?


केंद्रात सत्तास्थापनेसाठी केवळ 272 जागांची आवश्यकता असते. तरीही भाजपने देशभरात 400 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. हाच धागा पकडत विरोधकांनी, भाजपला 400 जागा जिंकून संविधान बदलायचे आहे, असा प्रचार सुरु केला. भाजपने ही निवडणूक जिंकल्यास ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल. भाजपाला 400 जागा मिळाल्यास ते देशात हुकूमशाही सुरू करतील, आणीबाणी लादतील, असे वेगवेगळे आरोप आणि दावे विरोधक करू लागले. परिणामी भाजपाच्या हेतूंवर शंका उपस्थित केली जाऊ लागली. भाजपाच्या या घोषणेमुळे भाजपासह मित्रपक्षांसमोर निवडणुकीच्या प्रचारात मोठं आव्हान निर्माण झाले होते.


देशातील दलित समाजाच्या मनात ही गोष्ट एवढी बिंबवली की आता भाजपाने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर देशाचं संविधान बदललं जाणार, असा अनेकांचा समज झाला.  स्वत:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक मुलाखती आणि प्रचारसभांमधून याचे उत्तर द्यावे लागले. मोदी एका वृत्तवाहिनीवर 15 ते 20 मिनिटे याच विषयावर बोलत होते, ‘असं होणार नाही, देशाचं संविधान बदललं जाणार नाही’, ही गोष्ट त्यांना सातत्याने पटवून द्यावी लागत होती, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा