Arvind Kejriwal On Operation Lotus: ऑपरेशन लोटसवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला (BJP) लक्ष्य केलं आहे. भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, भाजपचे लोक प्रत्येक राज्यात ऑपरेशन लोटस करत आहेत आणि आमदारांचा घोडेबाजार सुरु आहे. भाजप प्रत्येक राज्यात आमदारांची खरेदी करत असल्याचेही ते म्हणाले. यासाठी भाजपकडे पैसा कुठून येतो, असा सवाल त्यांनी केला.


अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपचे लोक ठिकठिकाणी ऑपरेशन लोटस राबवत आहेत. जिथले लोक त्यांचं ऐकत नाही, तिथे ते लोकांना सीबीआय आणि ईडीचा धाक दाखवतात. ते म्हणाले की, पंजाबमध्ये हे लोक आपच्या आमदारांना 25 कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांकडे हा पैसा येतो कुठून? याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोफत वीजेबाबत नवा नियम केला आहे. नव्या नियमानुसार आता त्या लोकांना सबसिडी मिळणार आहे, जे यासाठी अर्ज करतील.


दिल्लीत कट्टर प्रामाणिक सरकार : अरविंद केजरीवाल


अरविंद केजरीवाल म्हणाले की, आधी दिल्लीत लोकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता. मात्र आम्ही यंत्रणा तयार केली आणि आता दिल्लीत 24 तास वीज मिळत आहे. मोफत वीज पुरवणे. कट्टर प्रामाणिक सरकारमुळेच हे घडत आहे. ते म्हणाले की, दिल्लीत 47 लाख ग्राहकांना सबसिडी मिळते. 30 लाख लोक आहेत, ज्यांचे वीज बिल शून्य आहे. 16-17 लाख लोक असे आहेत, त्यांना निम्मी बिले येतात. पण काही लोक असे होते ज्यांना सबसिडी नको होती. यासाठी आम्ही सांगितले होते की, ज्यांना सबसिडी नको आहे, त्यांनी सांगावे. त्यानंतर 1 ऑक्टोबरपासून ज्यांना सबसिडी हवी आहे, त्यांनाच मिळेल. आता यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.


दरम्यान, गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी राज्यातील आठ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिला लोबो, राजेश फलदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सिओ सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस हे काँग्रेस आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, काँग्रेसची छोडो यात्रा सुरू झाली आहे.