नाशिक : राज्यातील महापालिका (Mahapalik) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश आणि पक्षांतराला वेग आला असून भाजपसह सत्ताधारी पक्षात इनकमिंग वाढले आहे. एकीकडे ठाकरे बंधू मुंबई महापालिकेसाठी एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे पुण्यात पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येत आहेत. तर, भाजपातही (BJP) जोरात पक्षप्रवेश सुरू आहेत. नाशिक भाजपमध्ये आज अनेक पक्षप्रवेश होत असून मनसेच्या माजी आमदाराचाही भाजपात प्रवेश होत आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मात्र, भाजपच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवत अनुपस्थित राहणे पसंत केले. त्यामुळे, स्थानिक भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ यांचाही भाजपात प्रवेश होत आहे. विशेष म्हणजे यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता. मात्र, तरीही वाघ यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते. यासह, काँग्रेस नेते शाहू खैरे हेही भाजपात येत आहेत. तसेच, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे दिनकर पाटील यांनी सातत्याने भाजपवर सडकून टीका केली होती. आता, त्यांचाही भाजपात प्रवेश झाला आहे.
सगळ्यांनाच तिकीट मिळेल असं नाही
नाशिकमधील भाजप नेत्या देवयानी फरांदे यांचा यतीन शाह यांच्यासह इतरही पक्षप्रवेशाला विरोध होता. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांचा विरोध मावळेल असे गिरीश महाजन यांनी म्हटले. तसेच, पक्षात प्रवेश घेतला म्हणजे तिकिट मिळेलच असं नाही, भाजपात आज सात-आठ जण प्रवेश करत आहेत. मात्र, या सगळ्यांनाच तिकिट मिळेल असं नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. तर, गेली अनेक वर्षं कार्यकर्ते पक्षात काम करतात, त्यामुळे विरोध होणं, थोड्या बहुत प्रमाणात नाराजी होणं साहजिक आहे, असे स्पष्टीकरणच महाजन यांनी दिले.
देवयानी फरांदेंचा कडाडून विरोध
भाजपकडून (BJP) नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे दोन बडे मोहरे गळाला लावले. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे. मात्र, या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे.